काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झालेल्या कार बॉम्बस्फोटात ५ जण ठार तर, तब्बल ५० जण जखमी झाले आहेत. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सोमवारी रात्री पावणेदहाला काबूलच्या पोलीस जिल्हा ९ (पीडी ९) या रहिवासी भागात हा स्फोट झाला. अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्या नुसरत रहिमी यांनी स्थानिक माध्यमाला याविषयी माहिती दिली.
या स्फोटामध्ये विदेशी सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य करण्यात आल्याचे तालिबानने म्हटले आहे.
हेही वाचा - सीरियात इसिसशी (ISIS) संबंधित अद्यापही ३ हजार दहशतवादी अस्तित्वात - रशिया
अमेरिकेचे राजदूत झालमे खलिलझाद यांनी अफगाण सरकारला तालिबानसोबत १८ वर्षे सुरू असलेले दीर्घ तत्वतः युद्ध संपवण्याच्या कराराविषयी माहिती दिल्यानंतर काही तासांतच हा स्फोट झाला.
अफगाणिस्तान सध्या युद्धामुळे जर्जरित झाला आहे. अमेरिका सध्या अफगाणमध्ये असलेल्या सैन्यापैकी बहुतांशी सैन्या माघारी बोलावून घेण्याच्या तयारीत आहे. मात्र, अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर सध्या तालिबानचे वर्चस्व असलेल्या अफगाण भूमीवरून दहशतवादाचा प्रचार-प्रसार केला जाणार नाही, या खात्रीच्या आधारावरच तालिबान-अमेरिका करार अवलंबून आहे.
हेही वाचा - जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयाला भारतीय जनतेचा प्रचंड पाठिंबा - अल्ताफ हुसेन