काबूल - अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हाती आली आहे. तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात अराजकता पसरली आहे. शुक्रवारी उत्तर अफगाणिस्तानमधील शिया मुस्लिम उपासकांनी खचाखच भरलेल्या मशिदीवर शुक्रवारी इस्लामिक स्टेटने आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात किमान 46 लोक ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. अमेरिकन सैन्याने देश सोडल्यानंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला आहे.
आत्मघाती हल्ला करणारा व्यक्ती उइगर मुस्लिम होता. कुंदुज शहरातील मशिदीमध्ये शुक्रवारी उपासक पार्थना करण्यासाठी जमले होते. यावेळी हा हल्ला झाला. गोजर-ए-सईद अबाद असे मशिदीचे नाव आहे. ऑगस्टमध्ये अमेरिका आणि नाटो सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर इस्लामिक स्टेटने तालिबान शासक, धार्मिक संस्था आणि अल्पसंख्यांक शिया मुस्लिमांना लक्ष्य केलं आहे. शिया मुस्लिमांना लक्ष्य करण्यामागे नेहमी सुन्नी मुस्लिमांचा हात असतो.
मुस्लिम धर्मात नक्की किती पंथ?
प्रामुख्यानं मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी असे दोन प्रमुख पंथ आहेत. मात्र या दोन्ही पंथांमध्येही असंख्य उपपंथ आहेत. अल्ला एकच आहे आणि मोहम्मद साहब अल्लाचे दूत आहेत, यावर दोन्ही पथांचे एकमत आहे. कुराण या पवित्र ग्रंथावर दोन्ही पंथाची श्रद्धा आहे. मात्र, दोन्ही पंथांचे कायदेकानून वेगळे आहेत. मुहंमद पैगंबरांच्या मृत्यूनंतर इस्लाम धर्मामध्ये शिया व सुन्नी असे दोन पंथ सुरू झाले होते. प्रथमतः ते वैयक्तिक मतभेदांमुळे झाले. पण पुढे त्यांच्यामध्ये वैचारिक आणि विधिविषयक मतभेदसुद्धा निर्माण झाले.
हेही वाचा - मला ईडीची नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेने वेडी ठरवले, पवारांचे टीकास्त्र