बगदाद - इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुदस फोर्सचा म्होरक्या कासीम सुलेमानी ठार झाला. या हल्ल्यानंतर आखाती देशातील परिस्थिती अशांत झाली आहे. सुलेमानी याच्या मृत्यूनंतर इराणमध्ये तीन दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात आला. अंत्यविधी दिवशीच इराक समर्थकांनी बगदादमधील अमेरिकेच्या लष्करी आणि दूतावासावर रॉकेट हल्ला केला. त्यामुळे अमेरिका आणि इराण वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
अमेरिकेने बगदाद विमानतळावर केलेल्या हल्ल्यात पॉप्युलर मॉबिलायझेशन फोर्सचा कमांडर अल मुबान्दीस हाही ठार झाला आहे. या उच्च राजनैकित हत्येनंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या
हल्ल्याचा कठोर बदला घेतला जाईल, असे इराणने स्पष्ट केले आहे. त्यानंतर एकाच दिवसात अमेरिकेच्या लष्करावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.
कोठे झाला रॉकेट हल्ला ?
संपूर्ण इराणमध्ये ५ हजारांच्या आजपास अमेरिकेचे सैन्य तैनात आहे. बगदादमधील अल-जदरीया भागात आणि बलाद हवाई तळाच्या बाहेर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. अमेरिकी दूतावास असलेल्या भागातही रॉकेट हल्ला झाला.
इराणने जर परदेशातील अमेरिकेचे नागरिक किंवा मालमत्तेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका इराणमधील ५२ महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच हा हल्ला युद्ध थांबवण्यासाठी होता युद्ध सुरू करण्यासाठी नव्हता, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
एकीकडे इराणचे अध्यक्ष अयातुल्लाह खामेनी यांनी अमेरिकेला या हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. इराण समर्थक बिगर लष्करी फौजांनी अमेरिकेच्या या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच अमेरिकेवर हल्ला करण्यास रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काल (शनिवारी) कासीम सुलेमानी यांच्या अंत्यविधीसाठी इराकमध्ये जनसागर लोटला होता. 'रिव्हेंज ईज कमिंग' अशा घोषणा देत हजारो इराण समर्थक बगदाद शहरात रस्त्यावर उतरले होते.