काबुल - अफगाणिस्तानच्या नानगरहर प्रांतातील साधारणपणे ९०० इसिस दहशतवादी पोलिसांना शरण आले. यामध्ये १० भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तर, या दहशतवाद्यांमध्ये सर्वाधिक दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचे समजत आहे.
या शरण आलेल्या लोकांमध्ये दहशतवादी तसेच, त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. भारताचे जे १० लोक शरण आले आहेत, त्यामध्ये महिला आणि मुलेही आहेत. त्यांपैकी बहुतेक लोक हे केरळचे असल्याची माहिती मिळत आहे. या १० लोकांना काबूलमध्ये हलवले गेले. इसिसमध्ये सामिल होण्यासाठी, २०१६ पासून साधारणपणे १२ पुरुष केरळहून अफगाणिस्तानला गेले होते. त्यामधील काही लोकांसोबत त्यांचे कुटुंबीयही होते, तर काहींनी नंतर इस्लाम धर्म स्वीकारला होता.
१२ नोव्हेंबरपासून अफगाणिस्तानच्या सैन्याने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली होती. त्यानुसार, नानगरहर प्रांतावर हल्ला चढवण्यात आला होता. हा हल्ला सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच साधारणपणे ९३ दहशतवादी सैन्याला शरण आले. त्यामध्ये १२ पाकिस्तानी दहशतावद्यांचा समावेश होता.
अफगाणी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात काही प्रमाणात दहशतवादी ठार झाले आहेत. अफगाण सैन्याने दिलेल्या माहितीनुसार नानगरहर प्रांतात आणखी भारतीय असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : दिल्ली पोलिसांनी उधळून लावला दहशतवादी कट , 3 जणांना अटक