वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी अद्यापही सुरू आहे. ३ तारखेला मतदान झाल्यानंतर आज ७ तारीख उजाडली आहे. मात्र, अजूनही मतमोजणी सुरू असल्याने अनेकजण बुचकाळ्यात पडले आहे. निकाल लागण्यास इतका उशीर का ? असा सवाल केला जात आहे. जगभरात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर महामारीचा अनेक गोष्टींवर परिणाम झाला. मग निवडणुका तरी कशा सुटतील. कोरोनामुळे अमेरिकेतील मतदान प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत.
का होतोय उशीर ?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान झाले. मात्र, ३ नोव्हेंबरआधीच सुमारे १० कोटी लोकांनी पोस्टाद्वारे, मेलद्वारे मतदान जमा केले होते. तर निवडणुकी दिवशीही नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. या व्यतिरिक्त शिल्लक राहिलेल्या नागरिकांना पोस्टाद्वारे मत देण्यास वेळ देण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे ४ आणि ५ नोव्हेंरपर्यंत पोस्टाद्वारे, मेलद्वारे मते जमा होत होती. ही सर्व मते मोजण्यास प्रशासनाला वेळ लागत आहे.
पोस्टाद्वारे नक्की मते जमा होतील याचा अंदाजही अनेक राज्यांना लागत नाही. त्यामुळे मतमोजणीत पुढे असलेला उमेदवारही मागे जाण्याची शक्यता आहे. अनेक राज्यात त्यामुळे अटीतटीची लढत सुरू आहे. जेथे डोनाल्ड ट्रम्प यांची आघाडी होती. तेथे नंतर पोस्टाद्वारे आलेली मते मोजण्यात आल्याने बायडेन यांनी आघाडी घेतली आहे. या उशीरा जमा होणाऱ्या मतांमुळे अद्यापही मतमोजणी लांबलेली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्षेप
अमेरिकेतील अनेक राज्यांत डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिक पक्ष आघाडीवर होता. मात्र, जसे पोस्टल मते येऊ लागली, तेथे ट्रम्प पिछाडीवर पडले आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांनी आघाडी घेतली. त्यामुळे ही उशीरा आलेली मते मोजली जाऊ नये, अशी मागणी ट्रम्प यांनी केली आहे. ही मते वैधानिक नसून त्यांची मोजणी थांबवावी अशी याचिका ट्रम्प यांनी विविध राज्यातील न्यायालयात केली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पेन्सल्वेनिया, नावेडा राज्यात बायडेन यांची आघाडी
हाती आलेल्या आकडेवारीनुसार पेन्सल्वेनिया, नवाडा, जॉर्जिया राज्यात जो बायडेन यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ते विजयाच्या आणखी जवळ पोहचले आहेत. यातील जॉर्जिया राज्यात दोन्ही उमेदवारांत फक्त २ हजार मतांचा फरक आहे. यातील एकाही राज्यात त्यांना बहुमत मिळाले तरी ते विजयी होतील. त्यांना २६४ मते मिळाली असून विजयी होण्यासाठी फक्त ६ मतांची गरज आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत.