जीनिव्हा - गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळ जग कोरोनाच्या सावटाखाली आहे. सामूहिक प्रतिकारक्षमतेमधून कोरोनावर मात करू, अशी जगातील बहुेतक देशांना आशा आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी कोरोनावरील सामूहिक प्रतिकारक्षमतेबाबत जगाला इशारा दिला आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी सामूहिक प्रतिकारक्षमता (हर्ड कम्युनिटी) रणनीती आणण्याचा प्रस्ताव म्हणजे अनैतिकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.
टेड्रोस घेब्रेयेसस हे सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, की सामूहिक प्रतिकारक्षमता निर्माण करणे, हे आरोग्य अधिकाऱ्यांचे सामान्यत: उद्दिष्ट असते. जर बहुतांश लोकसंख्येचे लसीकरण झाले तर संपूर्ण लोकसंख्येचे कोरोनापासून संरक्षण होऊ शकते. अत्यंत वेगाने पसरणाऱ्या विषाणुपासून सामूहिक प्रतिकारक्षमता विकसित होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रतिकारक्षमता असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ ९५ टक्के लोकसंख्येचे लसीकरण होणे आवश्यक आहे.
सामूहिक प्रतिकारक्षमता ही लोकांचे विषाणुपासून संरक्षण केल्याने विकसित होते. त्यांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले, की जगभरातील लोकसंख्येपैकी १० टक्के जणांमध्ये कोरोना विषाणुविरोधात प्रतिकारक्षमता असेल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला. त्याचा अर्थ बहुतांश लोकसंख्या ही प्रतिकारक्षमतेबाबत संशायस्पद असल्याचेही सूचित होते. जगभरातील कोरोनाच्या संसर्गाबाबतही त्यांनी मत व्यक्त केले. टेड्रोस म्हणाले, की गेल्या चार दिवसांत अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले.