वॉशिंग्टन : जॉर्ज फ्लॉईडचे प्रकरण ताजी असतानाच, अमेरिकेत आणखी एका कृष्णवर्णीयाचा पोलिसांमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डॅनियल प्रूड असे या व्यक्तीचे नाव आहे. वेस्टर्न न्यूयॉर्कमधील रोचेस्टर येथे रस्त्यावर निर्वस्त्र फिरणाऱ्या डॅनियलला पोलिसांनी पकडून, त्याच्या डोक्यावर थुंकीविरोधी बुरखा घातला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या पेव्हमेंटमध्ये त्याचे तोंड दाबून ठेवले होते, ज्यामुळे गुदमरून तो अत्यावस्थ झाला होता.
ही घटना २३ मार्चला झाली होती. त्यानंतर सात दिवसांनी रुग्णालयात डॅनियलचा मृत्यू झाला होता. बुधवारी त्याच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत यासंबंधी माहिती दिली, तसेच या घटनेशी संबंधित व्हिडिओही प्रदर्शित केले ज्यानंतर ही घटना प्रकाशात आली. व्हिडिओ पाहून कोणीही सांगू शकेल, की डॅनियल निःशस्त्र होता तसेच त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. वर्णभेद आणि वर्णद्वेष संपायला हवा, हे आपल्यापैकी किती जणांचे जीव गेल्यानंतर समाजाला समजणार आहे? असा प्रश्न यावेळी डॅनियलचा भाऊ जोई याने उपस्थित केला.
या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येते, की कशा प्रकारे पोलिसांनी डॅनियलला थुंकीविरोधी बुरखा घातला, आणि त्याचे तोंड पेव्हमेंटमध्ये दाबून ठेवले होते. काही वेळानंतर एक पोलीस अधिकारी डॅनियलला विचारतो, की तू उलटी करत आहेस का? त्यावर काहीच उत्तर येत नाही. डॅनियल निपचित पडलेला पाहून दुसरा एक अधिकारी म्हणतो, की मला वाटते तो बेशुद्ध झाला आहे. त्यानंतर काही वेळाने वैद्यकीय पथक येऊन त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करते.
एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्वासोच्छवासास अडथळा आल्यामुळेच डॅनियलचा मृत्यू झाला. यापूर्वीही अमेरिकेमध्ये तसेच इतर देशांमध्येही स्पिट-हूड, म्हणजेच थुंकीविरोधी बुरख्यामुळे कित्येक कैद्यांचा मृत्यू झाला आहे.
डॅनियल हा शिकागोवरुन रॉचेस्टरला आपल्या भावाकडे आला होता. २३ तारखेच्या रात्री डॅनियलचा भाऊ जोईने आपत्कालीन व्यवस्थेला संपर्क साधून, आपला भाऊ घरातून बाहेर पळाल्याचे सांगितले. तो मानसिक तणावाखाली असल्याचेही त्याने ९११ नंबरवर फोन करुन सांगितले होते. त्यानंतर त्याला शोधण्यासाठी पोलीस दाखल झाले होते. त्याला पकडण्यासाठी आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की डॅनियल पोलिसांच्या दिशेने वारंवार थुंकत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आम्ही त्याला तो बुरखा घातला होता.
डॅनियलच्या मृत्यूबाबत माहिती जाहीर होताच मोठ्या प्रमाणात आंदोलक रॉचेस्टरच्या पोलीस मुख्यालयाबाहेर जमा झाले होते. या घटनेतील दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी हे आंदोलक करत होते.