वॉशिंग्टन - अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 'क्लिन चीट' दिली आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाबाबत मतदान झाले. यात त्यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सुरुवातीला सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपाबाबत मतदान घेण्यात आले. यामध्ये ५२ विरूद्ध ४८ मतांनी ट्रम्प यांचा विजय झाला. त्यानंतर, संसदेच्या कारवाईमध्ये अडथळा आणण्याच्या आरोपाबाबत मतदान घेण्यात आले. यामध्ये ५३ विरूद्ध ४७ मतांनी ट्रम्प यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अमेरिकेच्या सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे ५३ सभासद आहेत, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ४७ सभासद आहेत.
रिपब्लिकन पक्षातील डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक मिट रोमनी यांनी सुरुवातीच्या मतदानात ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले. मात्र संसदेच्या कारवाईमध्ये अडथळा आणण्याच्या आरोपाबाबत झालेल्या मतदानात त्यांनी पक्षाचा आदेश पाळत ट्रम्प यांच्या समर्थनार्थ मतदान केले.
महाभियोगाला मान्यता मिळण्यासाठी दोन तृतीयांश सभासदांनी त्यासमर्थनार्थ मतदान करणे आवश्यक असते. म्हणजेच, रिपब्लिकन पक्षाच्या २० सभासदांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले असते, तरच ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाला मंजुरी मिळाली असती.
हेही वाचा : ट्रम्प यांचे तिसरे 'स्टेट ऑफ युनियन' भाषण; पेलोनी यांनी फाडल्या भाषणाच्या प्रती..