वॉशिंग्टन - अमेरिकेने इराणकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या चिनी कंपन्यांवर प्रतिबंध लादले आहेत. संयुक्त राज्य अमेरिकेचे राज्य सचिव माइक पॉम्पियो यांनी याविषयी माहिती दिली. 'अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी करण्यास मज्जाव केला असतानाही काही चिनी कंपन्यांनी इराणकडून तेल खरेदी केले आहे. त्यामुळे अमेरिकेने त्यांच्यावर प्रतिबंध लावले आहेत,' असे पॉम्पियो म्हणाले.
अमेरिका आणि इराणमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी युरोपकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. परंतु, अमेरिकेने या प्रकरणात दबाव आणखी वाढवला आहे. अमेरिकेने लादलेले निर्बंधांचे उल्लंघन केल्यामुळेच चिनी कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याचे पॉम्पियो यांनी म्हटले. तत्पूर्वी अमेरिकेने इराणचे ड्रोन विमान पाडल्याचा दावा केल्यानंतर पुन्हा होर्मुझच्या आखाती क्षेत्रामध्ये तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा - UNGA : काश्मीर मुद्द्यावरुन भारताबरोबर अणुयुद्ध करू; इम्रान खान यांची वल्गना
यानंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी इंग्लंडचा एक तेलवाहू टँकर आणि काही मालवाहू जहाजे जप्त केल्याची माहिती इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. युकेचा झेंडा असलेले स्टेना इम्पेरो या तेलवाहू जहाजाला आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये असताना हेलिकॉप्टर आणि चार जहाजांच्या मदतीने घेरण्यात आले. यानंतर या जहाजावर ताबा घेण्यात आला. या टँकरमध्ये एकूण 23 कर्मचारी असून यामध्ये भारतीय नागरिकही आहेत, असे इंग्लंडने प्रसिद्धिपत्रकामध्ये म्हटले होते.
इराणच्या गार्डनी सांगितले की, या जहाजाला आंतरराष्ट्रीय जलमार्ग कायदे न पाळल्याने जप्त करण्यात आले आहे. या जहाजाला इराणच्या बंदरावर ठेवले जाणार आहे. इंग्लंडचे सरकार किंवा जहाजाच्या कंपनीचा अद्याप जहाजाशी संपर्क झालेला नाही.
हेही वाचा - काश्मीरमधील मुस्लिमाची काळजी पण चीनमधल्या मुस्लिमांचं काय?, अमेरिकेचा पाकिस्तानला प्रश्न