वाशिंग्टन - भारताने जर हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही, तर आम्ही भारताचा सूड घेऊ अशी धमकी दिल्यानंतर 24 तासांच्या आत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर बदलला आहे. भारताने अमेरिकेला हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन औषध देण्याची तयारी दर्शवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महान आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
मी 29 दशलक्षांपेक्षा जास्त डोस विकत घेतले आहेत. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही बोललो आहे. बरीच औषधे ही भारतातून येत आहेत. ते आम्हाला देणार का, याबद्दल मी मोदींना विचारले. मोदी खरोखरच महान आणि चांगले आहेत. भारतासाठी हवे असल्यामुळे त्यांनी औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, हे मला माहिती आहे. पण त्यातून अनेक चांगल्या गोष्टी पुढे येत आहेत', असे म्हणत त्यांनी मोदींचं कौतुक केलं.
हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन हे औषध कोरोनाच्या उपायासाठी परिणामकारक सिद्ध ठरत आहे. अनेक रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन हे औषध कोरोनाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असल्याचे काही चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यानंतर अमेरिकेने या औषधाची भारताकडे मागणी केली होती. मात्र, भारताने देशातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या औषधाच्या निर्यातीला बंदी आणली आहे.दरम्यान, अमेरिकेसोबतच आणखी काही देशांनीही या औषधाची मागणी भारताकडे केली आहे