वॉशिंग्टन - झाडांना त्यांचे अन्न सुर्यप्रकाशापासून मिळते. झाडांची पाने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्ननिर्मिती करुन झाडांना जिवंत ठेवतात. मात्र, एखाद्या झाडाची सर्व पाने गळून गेल्यानंतर देखील त्याच्या आजूबाजूची झाडे त्याला जिवंत ठेवत असल्याचे एका नवीन संशोधनात समोर आले आहे.
आय-सायन्स या विज्ञानविषयक नियतकालीकामध्ये याविषयीचा लेख प्रसिद्ध झाला आहे. मार्टीन बेडर आणि सेबॅस्टिअन ल्यूझिंगर यांनी याविषयी संशोधन केले आहे. आम्ही वेस्ट ऑकलँडमध्ये गिर्यारोहण करताना आम्हाला एक 'कौरी' झाडाचे खोड दिसले. त्याला एकही पान नसताना देखील ते जिवंत असल्याचे समजल्यावर आम्हाला आश्चर्य वाटले. त्यामुळे आम्ही त्यावर आणखी अभ्यास करण्याचे ठरवले. अशी माहिती सेबॅस्टिअन ल्यूझिंगर यांनी दिली.
झाडांची मुळे जमीनीखाली एकमेकांना जोडली जाऊन, अन्न आणि पाण्याची देवाणघेवाण करतात. एकसारख्या प्रजातींच्या झाडांमध्ये ही सामान्य बाब असली तरी, बऱ्याच वेळा सारख्या प्रजातीतील नसलेल्या झाडांमध्येदेखील अशी देवाणघेवाण होऊ शकते. एकमेकांच्या फायद्यासाठी झाडांमध्ये अशी देवाणघेवाण होते. मात्र याठिकाणी या कौरी झाडाच्या खोडापासून आजूबाजूच्या झाडांना कोणताही फायदा होताना दिसत नव्हता. तरीही या झाडांनी त्याला जिवंत ठेवले, हे विशेष.
या संशोधनामुळे आपला झाडांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला जाईल. झाडांकडे पाहताना आपण त्यांचा विचार एक वैयक्तिक घटक म्हणून करत होतो, मात्र आता संपूर्ण जंगलाकडे एक संघटित संस्था म्हणून आपल्याला पहावे लागेल. दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये आपण कदाचित कमी पाणी ओढणाऱ्या झाडांना जास्त पाणी ओढणाऱ्या झाडांशी जोडून जास्त काळ जिवंत ठेऊ शकेल, मात्र त्यासाठी या विषयावर आणखी संशोधन गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही वेस्ट ऑकलँडमधील कौरी झाडासारखीच आणखी उदाहरणे शोधत आहोत, अशी माहितीही ल्यूझिंगर यांनी दिली.