अल्तामारीया - ब्राझीलच्या एका तुरुंगामध्ये उफाळलेल्या हिंसाचारात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तुरुंगातील संघटीत गुन्हेगारांच्या गटांमध्ये सोमवारी सकाळी नाष्ट्याच्या वेळी वाद झाला. यामध्ये १६ कैद्यांचे शिरकाण करण्यात आले, तर इतरांना गळा दाबून मारण्यात आले.
ही घटना उत्तर ब्राझीलमधील अल्तामारीया तुरुंगात सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे राज्याचे तुरुंग अधिकारी जारबास व्हॅसकॉनसीलोस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दंगलीच्या वेळी कैद्यांनी आग लावल्याने पोलिसांना ५ तासांपर्यंत दंगल आटोक्यात आणता आली नाही.
याआधी अॅमेझॉन राज्यात तुरुंगामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. अॅमेझॉन राज्यात २०१७ साली वेगवेगळ्या तुरुगांमध्ये ५५ कैद्यांचा मृत्यू झाला होता. तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये हिंसाचारात एकून १२० कैद्यांचा मृत्यू झाला होता. ब्राझीलच्या तुरुंगामध्ये कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात पोलिसांना अवघड जात आहे. काही कैदी तुरुंगातूनही गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत.