वॉशिंग्टन - शुक्रवारी क्वाड देशांच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी चारही देशांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मुक्त व्यापाऱ्याला प्रोत्साहन देण्याचा पुर्नउच्चार केला. वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आयोजित केलेल्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिडे सुगा यांनी सहभाग घेतला होता.
आम्ही कायद्या सुव्यवस्था, नेव्हिगेशन आणि उड्डाण स्वातंत्र्य, विवादांचे शांततापूर्ण निराकरण, लोकशाही मूल्ये आणि राज्यांच्या प्रादेशिक अखंडतेसाठी कटिबद्ध आहोत. आम्ही एकत्र आणि अनेक भागीदारांसह काम करण्यास वचनबद्ध आहोत, असे बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आले. दक्षिण चीन समुद्रात चीनची वाढलेली आक्रमकता प्रादेशिक तणाव वाढवत आहे. दक्षिण चीन समुद्रातील नाईन-डॅश लाईनवर चीनचा एकतर्फी दावा; जिबूतीमध्ये आपला पहिला परदेशी तळ आणि मलाक्का सामुद्रधुनीच्या पलीकडे हिंदी महासागरातील त्याच्या पृष्ठभागाच्या आणि उप -पृष्ठभागावरील कारवायांमुळे प्रादेशिक देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
क्वाड देशांच्या बैठकीत आसियान गटांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले. आम्ही आसियानची एकता आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आसियानच्या भुमिकेचे समर्थन करतो, असेही क्वाड देशांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.