न्यूयॉर्क - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे नर्व्हस आणि कमी योग्यतेचे नेते आहेत. त्यांना आपल्या आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. मात्र, त्यांच्याकडे विषयामध्ये प्रभुत्व मिळवण्याची क्षमता आणि उत्कटतेची कमतरता असल्याने त्यांना अपयश येत आहे, असे ओबामा यांनी आपल्या 'ए प्रॉमिस्ड लँड' या पुस्तकामध्ये राहुल गांधींविषयी नमुद केले आहे. तसेच जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही त्यांनी भाष्य केले आहे.
न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका समिक्षेनुसार, ' राहुल गांधी अशा विद्यार्थ्याप्रमाणे आहेत. ज्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्यांना आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. मात्र, त्या विषयात प्रभुत्व मिळण्यासाठी त्यांच्याकडे योग्यता नाही किंवा त्यांच्या तेवढी उत्कटता नाही, असे वर्णन त्यांनी राहुल गांधींचे केले आहे.
सोनिया गांधींचा उल्लेख -
ओबामा यांनी राहुल गांधींसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा उल्लेखही केला आहे. चार्ली क्रिस्ट आणि रहम एमॅन्युअल यांसारखे पुरूष हँडसम असल्याचे आम्हाला सांगितले जाते. मात्र, महिलांच्या सौदर्याबद्दल सांगितलं जात नाही. यासाठी एक किंवा दोन उदाहरणेच अपवाद आहेत. जसं की सोनिया गांधी, असे वर्णन त्यांनी सोनिया गांधीचे केले आहे.
मनमोहन सिंग यांच्याविषयी -
ओबामा यांनी मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री बॉब गेट्स यांना 'प्रचंड निष्ठा ठेवणारे व्यक्ती' असे म्हटलं आहे. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे शिकागो मशीन चालवणारे मजबूत आणि धुर्त बॉसची आठवण करून देतात, असे ओबामा यांनी म्हटलं आहे.
17 नोव्हेंबर पुस्तक बाजारात उपलब्ध -
ओबामा यांचे 768 पानांचे पुस्तक 17 नोव्हेंबर रोजी बाजारात उपलब्ध होणार आहे. बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात 2010 आणि 2015 मध्ये भारताचा दौरा केला होता.