वॉशिंग्टन - ३ नोव्हेंबर २०२०ला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांनी एकमेकांवर जोरदार टीका करण्याचा धडाका सुरू केला आहे. 'ज्या अनियमितपणे ट्रम्प यांनी कोरोना महामारीचे संकट हाताळले, तितकीच अनियमित त्यांची कारकिर्द आहे', असा आरोप जो बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर केला आहे. ट्रम्प यांचे नेतृत्व गुंतागुंतीचे आणि विभाजक वृत्तीचे होते आणि आहे. याची अमेरिकेला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल असेही बायडन म्हणाले.
फ्लोरिडा येथील प्रचार सभेत जो बायडन बोलत होते. ट्रम्प यांना फक्त स्वत:ची काळजी आहे. अमेरिकन जनतेशी त्यांना काही घेणे-देणे नाही. कोरोना महामारीच्या काळात आदरणीय राष्ट्राध्यक्षांनी फ्लोरिडातील जनतेला मदत देण्यास कुचराई केली. त्यामुळे तेथील अनेकांना आपला जीव गमावावा लागला, अशी कोपरखळी बायडन यांनी ट्रम्प यांना लगावली.
कोरोना संसर्गाचा धोका कायम असूनही ट्रम्प यांनी मोठ्या-मोठ्या प्रचारसभा घेतल्या. या सभांदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मात्र, त्यांना याचे काही घेणे-देणे नाही. त्यांना फक्त आपला प्रचार महत्त्वाचा वाटतो, असे बायडन यांनी सांगितले. बायडन यांनी ट्रम्पच्या कारकिर्दीत घेतल्या गेलेल्या विविध निर्णयांवर टीका केली. कर आणि व्हिसा धोरणात केलेले बदल सर्वासमावेशक नसल्याचेही बायडन म्हणाले.
२०१६च्या निवडणुकीत फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांना विजय मिळाला होता. 'रियल क्लिअर पॉलिटिक्स'च्या ओपीनियन पोलनुसार यावर्षी फ्लोरिडामध्ये ३.७ टक्क्यांनी बायडन आघाडीवर आहेत.