वॉशिंग्टन डी. सी. - इराणने अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडले. त्यावर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेचे ड्रोन विमान पाडून इराणने खूप मोठी चूक केली आहे, असे ट्रम्प यांनी टि्वटवरून म्हणाले. आखातमध्ये आधीच तणाव असताना इराणच्या या कृतीमुळे येणाऱ्या दिवसात तणाव आणखी भडकण्याची शक्यता आहे.
इराणने आम्हाला युद्धाची धमकी देऊ नये, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच दिला होता. आता अमेरिकेचे ड्रोन पाडल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांना बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी या घटनेबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव साराह सँडर्स यांनी सांगितले.
अमेरिकेचे ड्रोन विमान इराणच्या हवाई हद्दीत आल्यामुळे आम्ही ते पाडले असे इराणच्या रेवोल्युशनरी गार्डनी सांगितले. अमेरिकेचे आरक्यू-४ ग्लोबल हॉक ड्रोन पाडण्यात आले. मागच्या काही दिवसात आखातामध्ये ओमानच्या समुद्रात दुसऱ्या देशांच्या दोन तेलाच्या टँकरवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ओमानच्या समुद्रात तेलाच्या दोन टँकरवर झालेल्या हल्ल्यासाठी अमेरिका आणि अन्य देशांनी इराणला जबाबदार ठरवले आहे. इराणने आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत.