वॉशिंग्टन - भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आता आणखी एका भारतीय वंशाच्या महिलेची महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली आहे. भव्या लाल यांची अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या मार्फत नासामध्ये सुचवल्या जाणाऱया बदलांच्या समितीच्या त्या सदस्याही आहेत. भव्या यांच्याकडे दीर्घ अनुभव आहे. त्यांनी २००५ ते २०२० या काळात संरक्षण आणि तंत्रज्ञान विभागात अभियांत्रिकी आणि अवकाश शास्त्र संशोधक म्हणून काम केलेले आहे, असे नासाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात म्हटले आहे.
भव्या लाल यांनी न्यूक्लिअर सायन्समध्ये पदवी मिळवलेली आहे. याशिवाय त्यांच्याकडे जॉर्जिया विद्यापीठाची मास्टर्स डीग्री असून त्यांनी डॉक्टरेटही मिळवलेली आहे. त्यांनी काही काळ सागरी शास्त्र आणि संशोधन विभागातही काम केलेले आहे.