वॉशिंग्टन डी. सी. - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. तब्बल 180पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अद्ययावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 57 लाख 89 हजार 843 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
जगभरात कोरोनामुळे तब्बल 3 लाख 57 हजार 432 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 24 लाख 97 हजार 618 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत फ्रान्समध्ये 66 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूचा आकडा हा 28 हजार 596वर पोहचला आहे. तर दक्षिण कोरियामध्ये 1 हजार 673 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.
देशातून कोरोना महामारीचा संपूर्णपणे नायनाट झाल्याचे जाहीर करणारा स्लोव्हेनिया हा पहिला युरोपियन देश ठरला आहे. तसेच सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी नवीन प्रकारची खोकल्याची गोळी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी सांगितले, की लोकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी ही गोळी घ्यावी. ही गोळी खोकताना किंवा शिंकताना हवेत हवेत पसरणाऱ्या थेंबांना रोखू शकते.