न्यूयॉर्क - अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या भारतवंशीय कमला हॅरीस यांचे पती डॉ एम्हॉफ यांच्याविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. पत्नी कमला यांच्याविषयीचा अभिमान निःसंकोचपणे व्यक्त करणाऱ्या एम्हॉफ यांची अमेरिकेत चांगलीच चर्चा होत आहे.
एम्हॉफ यांना पत्नीविषयी अभिमान
सार्वजनिक ठिकाणी मनमोकळेपणाने आपले प्रेम व्यक्त करणारे एम्हॉफ यांना पत्नीविषयी अत्यंत अभिमान आहे. आणि तो व्यक्त करताना ते कसलाही संकोच बाळगत नाही. सार्वजनिक ठिकाणी वावरताना आणि बोलतानाही एम्हॉफ कमला यांच्याविषयीचे प्रेम आणि आदर निःसंकोचपणे व्यक्त करतात.
जोडीदाराच्या यशाविषयी असूया नाही
पुरूषी अहंकाराला दूर सारत जोडीदाराचे यशाची असूया न बाळगणारे एम्हॉफ हे आदर्श पती असल्याचे कौतुक अमेरिकी माध्यमे करताना दिसत आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध ओप्रा मासिकातही एम्हॉफ यांच्या निर्भेळ पत्नीप्रेमाचे कौतुक करणारा लेख छापून आला आहे. 'एका जोडीदारात हवे असणारे सर्व गुण असलेला अनोखा पुरूष' असे एम्हॉफ यांचे वर्णन या लेखात करण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी निःसंकोचपणे व्यक्त करतात प्रेम
कमला हॅरीस आणि डॉ एम्हॉफ हे दोघेही सार्वजनिक ठिकाणी अतिशय निःसंकोचपणे एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. आपल्या कृतीतूनही ते एकमेकांविषयीचे प्रेम आणि आदर व्यक्त करतात. त्यामुळे या जोडप्याच्या प्रेमाविषयी अमेरिकेत चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
2014 मध्ये झाले विवाहबद्ध
कमला हॅरीस आणि डॉ एम्हॉफ यांचा 2014 मध्ये विवाह झाला. या दाम्पत्याला दोन अपत्ये आहेत. ही दोन्ही अपत्ये एम्हॉफ यांच्या पहिल्या पत्नी केर्स्टिन मॅकीन यांच्यापासून आहेत. एम्हॉफ यांचा 1992 मध्ये केर्स्टीन मॅकीन यांच्याशी विवाह झाला होता. 2008 मध्ये ते दोघे विभक्त झाले.
हेही वाचा - ..आता डोनाल्ड ट्रम्प यांचं पुढे काय?