वॉशिंग्टन डी. सी - जगभरात कोरोनाच्या प्रसारास चीन जबाबदार असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केले आहे. यातच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर मोठा आरोप केला आहे. अमेरिकेने कोरोना विषाणूवर केलेल्या संशोधनातील डेटा चीन चोरत असल्याचा आरोप माईक पॉम्पिओ यांनी केला आहे.
अमेरिकन बौद्धिक मालमत्ता आणि कोरोना संशोधनाशी संबंधित डेटा चीनशी निगडीत असलेल्या सायबर हँकर्सनी चोरण्याचा प्रयत्न केला आहे. या कारवाईचा आम्ही निषेध करतो, असे अमेरिकेने म्हटले आहे. हॅकर्स इतर काही संस्थांच्या संशोधनालाही लक्ष्य बनवू शकतात. हे हॅकर्स चीन सरकारशी थेट संपर्कात आहेत, असा दावा एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी विभागाने 13 मे ला केला होता.
यापूर्वी माईक पोम्पीओ यांनी चीनवर कोरोनाविषाणूच्या मुद्द्यावर पारदर्शक नसल्याचा आरोप केला होता. चीनने सुरुवातीपासूनच विषाणूवर चर्चा करणे थांबवले, असे पोम्पीओ म्हणाले होते. तसेच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाचा फैलाव होण्यासाठी चीनला जबाबदार धरले आहे. चीनच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान चीनने हे आरोप फेटाळले आहेत.
संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 1 हजार 754 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ८० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १२ लाखांहून अधिक जणांना संसर्ग झाला आहे.