वाशिंग्टन डी. सी - अमेरिकन सैन्यांनी अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर सत्ता तालिबानच्या हातात गेली असून तेथील परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. नागरिक मिळेल त्या मार्गाने तालिबानी राजवटीतून आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. मन पिळवटून टाकणारी दृश्य समोर येत आहेत. या संपूर्ण परिस्थितीला अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांना जबाबदार धरण्यात येत आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मात्र, बायडेन आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सैन्य माघारीच्या निर्णयाचे बायडेन यांनी समर्थन केलं आहे. तर्कसंगत, विवेकी आणि योग्य निर्णय म्हणून याची इतिहासात नोंद होईल, असे बायडेन म्हणाले.
गेल्या 15 ऑगस्टला अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला. याच्या दोन आठवड्यापूर्वीच अमेरिकाने आपले सैन्य परत घेण्याची प्रकिया वेगवान केली होती. एक ते दोन प्रांत सोडले तर अफगाणिस्तावर तालिबानची राजवट आली आहे. तालिबानच्या राजवटीपासून वाचण्यासाठी आणि अमेरिका, युरोपियन राष्ट्रांत आश्रय मिळवण्यासाठी हजारो अफगाणी नागरिक देश सोडून पळून जात आहेत. परिणामी काबूल विमानतळावर गर्दी झाली आहे. यात चेंगराचेंगरीची घटना घडली असून 7 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
माझ तुमच्यावर प्रेम, पण विश्वास नाही -
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान बायडेन यांना पत्रकाराने तालिबानवर तुमचा विश्वास आहे का, असा प्रश्न केला. यावर जो बायडेन म्हणाले, की माझा कोणावरही विश्वास नाही. मी तुमच्यावर (पत्रकारांवर) प्रेम करतो. पण विश्वास नाही. तालिबान्यांनी आधी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. लोकांना सुविधा पुरवल्या पाहिजेत. तालिबानने अमेरिकन सैन्याविरूद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. अमेरिकन नागरिकांवर हल्ले करणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले होते. ते त्यांनी पाळले. असेच तालिबान्यांनी अनेक आश्वासने दिली आहेत. जे बोलतात ते खरे ठरते की नाही, ते पाहू, असे बायडेन म्हणाले.
नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यास प्राथमिकता -
36 तासांच्या कालावधीत अमेरिकेने सुमारे 11,000 लोकांना काबूलमधून बाहेर काढले आहे. तर 14 ऑगस्टपासून आज सकाळपर्यंत, जवळजवळ 28,000 लोकांना बाहेर काढले आहे. जुलैपासून आम्ही काढलेल्या लोकांची एकूण संख्या अंदाजे 33,000 असल्याचे बायडेन यांनी सांगितले. अमेरिकनांना शक्य तितक्या लवकर आणि सुरक्षितपणे देशाबाहेर काढणे ही पहिली प्राथमिकता असल्याचं त्यांनी म्हटलं.
ट्रम्प यांचे कौतूक तर बायडेन यांच्यावर टीका -
अमेरिकेने तालिबानसमोर गुडघे टेकले आणि अफगाणिस्तानमधील आपल्या सहयोगींना सोडून दिले आहे, असे संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी रविवारी म्हटलं. त्यांनी बायडेन यांच्या सैन्य माघारीच्या निर्णयावर ताशेरे ओढले. तालिबानसमोर संपूर्ण आत्मसमर्पण हे एक लाजिरवाणे अपयश आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतूक केले. ट्रम्प सत्तेत असताना अफगाणिस्तान सुरक्षित होता, असे त्या म्हणाल्या.
सैन्य माघारीचा निर्णय मूर्खपणाचा -
ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी अफगाणिस्तानातून सैन्य माघारीच्या अमेरिकेच्या निर्णयावर टीका करताना हा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे. ब्लेअर यांनी त्यांच्या संकेतस्थळावरून एक दीर्घ लेख लिहून सैन्य माघारीच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. अफगाणिस्तानातून अचानक आणि गोंधळाच्या स्थितीत सैन्य माघारी घेतल्याने तालिबानला इथे पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली. यामुळे गेल्या दोन दशकांमध्ये अफगाणिस्तानात जे काही मिळविले गेले ते सर्व काही गमवावे लागले. नागरिकांची उंचावलेली जीवनशैली, महिलांचे शिक्षण अशा सर्व प्रकारचे यश यामुळे गमवावे लागले असे ब्लेअर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - अफगाणिस्तानातील परिस्थितीला स्थानिक नेतेच जबाबदार - अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन
हेही वाचा - Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर तालिबानाचा ताबा; जाणून घ्या जगातील प्रमुख नेते काय म्हणाले...
हेही वाचा - अफगाणिस्तानातील सर्व नागरिकांना मायदेशी आणणार; राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं वचन