वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेले जो बायडेन यांचा शपथविधी समारोह जानेवारी महिन्यात होणार आहे. व्हाईट हाऊसमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीतकमी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्याचे नियोजन सुरू आहे.
कोरोना नियमांचे पालन करत समारोह
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही तज्ज्ञांच्या सुचनांचे पालन करणार आहोत. त्यामुळे यावर्षीच्या शपथविधी कार्यक्रमावेळी वॉशिंग्टन डी. सी मधील नॅशनल मॉलमध्ये जास्त लोकांना जमण्यास परवानगी दिली जाणार नाही. व्हॉईट हाऊसमध्ये होणार कार्यक्रम नॅशनल मॉलच्या मैदानावर जमून हजारो नागरिक पाहत असतात. मात्र, यावेळी हे शक्य होणार नसल्याचे जो बायडेन यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले. शपथविधीचा सोहळा व्हर्च्युअली जास्त जण पाहण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
जॉन हॉपकिन्सन विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत १ कोटी ४० लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. २ लाख ७३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत. लस निर्मितीच्या कामात प्रगती होत असली तरी अद्याप अमेरिकेत लसीस परवानगी देण्यात आली नाही.