वॉशिंग्टन - गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी २०२० च्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एक विशेष संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांनी मुक्त, आशावादी आणि काम करण्यासाठी अधीर असावे, असे पिचाई म्हणाले. आपल्याकडे 'सर्वकाही बदलण्याची संधी' आहे असा दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी ठेवावा असेही पिचाई म्हणाले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पदवीदान समारंभ देखील ऑनलाईन केले जात आहेत. गुगले व्हिडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या युट्यूबने यावर्षी पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खास व्हर्च्युअल निरोप समारंभ आयोजित केला होता. या समारंभात सुंदर पिचाई यांच्यासोबत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा, कोरियन पॉप ग्रुप बीटीएस, गायक बियॉन्से, लेडी गागा, माजी संरक्षण सचिव रॉबर्ट एम गेट्स, माजी परराष्ट्र सचिव कंडोलीझा राईस आणि सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
असा व्हर्च्युअल निरोप आणि पदवीदान समारंभ होईल अशी आपल्यापैकी कोणीही कल्पना केली नसेल. मात्र, कोरोनामुळे आपल्यावर ही वेळ आली आहे. कदाचित आपल्यापैकी काहींना दु:ख होत असेल की, असा पदवीदान समारंभ करावा लागत आहे. मात्र, सध्याच्या कठीण काळामध्ये आपण सर्वांनी आशावादी राहिले पाहिजे, असे पिचाई म्हणाले.
आत्ताची कठीण परिस्थिती बघता २०२० च्या पदवीधर विद्यार्थ्यांकडे सर्वांत जास्त संधी आहे स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याची. सर्व काही बदल्याची संधी आहे, तिचे सोने करा. असे झाल्यास इतिहासात २०२० च्या बॅचचे नाव कायम घेतले जाईल, अशा शब्दांत पिचाई यांनी विद्यार्थ्यांचे धैर्य वाढवले.
यावेळी पिचाई यांनी अमेरिकेत घालवलेल्या सुरुवातीच्या काही दिवसांचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. पिचाई यांना स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकता यावे यासाठी त्यांच्या वडिलांनी वर्षभराची कमाई खर्च करून विमानाचे तिकीट काढले होते. त्यांचे कष्ट आणि माझी तंत्रज्ञानाप्रती असलेली आवड मला आज या पदापर्यंत घेऊन आली आहे, असे पिचाई यांनी सांगितले.