वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडून सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. जो बायडेन आणि डेमोक्रॅटीक पक्षाकडून उपाध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या कमला हॅरिस यांना विजय मिळवून देण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा प्रचार करणार आहेत. असे असले तरी, ट्रम्प यांनी बराक ओबामा हे प्रभावशाली प्रचारक नाहीत. कारण, त्यांनी 2016मध्ये अत्यंत वाईट प्रचार केला होता, म्हणून मी अमेरिकेचा अध्यक्ष झालो', अशी टीका केली आहे.
बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असताना, दोन्ही कार्यकाळात जो बायडेन हे उपराष्ट्राध्यक्ष होते. याआधी बराक ओबामा यांनी जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यासाठी ऑनलाइन प्रचार केला आहे. मात्र, नागरिकांमध्ये जाऊन प्रचार करण्याची त्याची ही पहिली वेळ असणार आहे.
याचबरोबर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनीही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. डोनाल्ड ट्रम्प हे वर्णद्वेषी आहेत आणि ते राष्ट्राध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. तसेच बायडेन यांना मतदान करावे, असे आवाहनही मिशेल ओबामा यांनी केले होते.
अमेरिकी राज्यघटनेनुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ केवळ 4 वर्षे आहे. ट्रम्प यांचा हा कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपुष्टात येईल. 2016च्या निवडणुकीत फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांना विजय मिळाला होता. 'रियल क्लिअर पॉलिटिक्स'च्या ओपीनियन पोलनुसार यावर्षी फ्लोरिडामध्ये 3.7 टक्क्यांनी बायडन आघाडीवर आहेत. 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.