वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेला इतिहासात पहिल्यांदाच कृष्णवर्णीय संरक्षण मंत्री मिळणार आहे. लॉयड ऑस्टिन यांच्या नावावर सिनेट सभागृहाने शिक्कामोर्तब केले आहे. ४१ वर्षांच्या लष्करी सेवेत त्यांनी वंशभेदाचे सर्व अडथळे पूर्ण करत कर्तृत्वाच्या जोरावर देशाच्या संरक्षण मंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. ट्रम्प यांच्या कारकिर्दीत वंशभेद आणि कृष्णवर्णीयांवरील हल्ल्याच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला होता. त्यातच आता देशाला कृष्णवर्णीय संरक्षण मंत्री लाभला आहे.
बायडेन मंत्री मंडळातील ठरले दुसरे मंत्री-
९३ विरुद्ध २ मतांनी अमेरिकेच्या संसदेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. बायडेन मंत्रीमंडळातील ते दुसरे नेते ठरले आहेत. तर अर्विल हाईन्स यांची राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये इतर सदस्यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. यात परराष्ट्र मंत्री अॅन्टोनी ब्लिक्लिंन यांचा समावेश आहे.
पँटागॉन कार्यालयातील कामाचा अनुभव -
२०१२ साली ऑस्टिन पहिले कृष्णवर्णीय व्हाईस चीफ ऑफ स्टाफ होते. तसेच त्यांनी लष्कराचे संयुक्त महासंचालक म्हणूनही काम पाहिले आहे. लष्कराच्या पँटागॉन कार्यालयात अनेक वर्ष पडद्यामागे राहून काम केल्याने कामकाजाची खडानखडा माहीत झाली आहे. त्याचा फायदा त्यांना आता संरक्षण मंत्री होताना झाला. प्रसिद्धीच्या झोतात न राहता काम करण्याची त्यांची पद्धत आहे. धिप्पाड शरीरयष्टी आणि भारदस्त आवाजावरून ते ओळखले जातात. सर्वसामान्य कुटुंबात येऊन त्यांनी संरक्षण मंत्री पदापर्यंत मजल मारली आहे.