वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपर्कातील आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्टीफन मिलर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. यानंतर व्हाईट हाऊसमधील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या १०वर पोहोचली आहे.
व्हाईट हाऊसमधील ट्रम्प यांच्या थेट संपर्कात असणाऱ्या व्यक्तींची दररोज कोरोना चाचणी पार पडते. गेल्या पाच दिवसांपासून माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह येत होती, मात्र काल (मंगळवारी) केलेल्या चाचणीमध्ये मला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. आता मी विलगीकरणात आहे, अशी माहिती मिलरने दिली.
गेल्या आठवड्यामध्ये ट्रम्प यांच्या थेट संपर्कात असलेला कर्मचारी होप हिक्स हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर गुरुवारी ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मिलेनिया यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ट्रम्प यांना मिलिट्री रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दण्यात आला होता.
यापूर्वी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केलीघ मॅकईनॅनी आणि प्रेस ऑफिसमधील आणखी तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच, व्हाईट हाऊसमध्ये काम करणाऱ्या तीन पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, उपाध्यक्ष माईक पेन्स यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. बुधवारी ते कमला हॅरिस यांच्यासह उपाध्यक्ष स्तरावरील वादविवाद चर्चेमध्ये सहभागी होतील.
हेही वाचा : जगात प्रत्येक 10 पैकी एक जण कोविड -19 बाधित रुग्णांच्या संपर्कात - WHO