वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेतील टेक्सास राज्यात एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल १३० गाड्या या अपघातात सापडल्या. आंतरराज्यीय महामार्गावरील या विचित्र अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी चारचाकी, मालवाहतूक ट्रक सह १३० वाहनांचा ढिगारा पडला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात हानी पाहून पोलिसही चक्रावून गेले. गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
हिवाळी वादळामुळे हिमवृष्टी आणि पाऊस -
टेक्सास राज्यात हिवाळी वादळे सुरू झाली आहेत. त्यामुळे तापमान कमालीचे घसरले असून पावसासोबत हिमवृष्टीही होत आहे. निसरड्या रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अनेक गाड्या एकमेकांवर चढल्या होत्या. अनेकजण गाड्यांमध्ये अडकून पडले होते. पोलिसांनी क्रेनची मदत घेवून गाड्या बाजूला कराव्या लागल्या. अनेकांची या अपघातातून सुखरुप सुटका केली.
घटनास्थळी गाड्यांचा खच-
सुमारे ६५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली. पाऊस आणि हिमवृष्टीमुळे बचावकार्यात अडचणी येत असल्याचे बचाव पथकाने सांगितले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस असून सर्व अपघातग्रस्त गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरु आहे.