पोर्ट-औ-प्रिन्स - हैतीमधील अनाथालयाला लागलेल्या आगीत १५ बालकांचा मृत्यू झाला. हे अनाथालय अमेरिकेतील एका ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या ख्रिश्चन गटाकडून चालवले जाते. २ बालकांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर, १३ जणांचा धुराने गुदमरल्यामुळे श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होऊन रुग्णालयात मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशिरा ही आग लागली होती.
पोर्ट-औ-प्रिन्सच्या बाहेरच्या परिसरात हे अनाथालय आहे. येथील चर्च ऑफ बायबल अंडरस्टँडिंगद्वारे हे अनाथालय मागील ४० वर्षांपासून चालवण्यात येत आहे. हे चर्च पेन्सिल्वानिया येथील ख्रिश्चन संस्थेशी संबंधित आहे. येथील इमारतींची ६६ मुले राहण्याइतकी क्षमता आहे.
'दुर्दैवाने येथील फर्माथे रुग्णालयात मुलांना नेल्यानंतरही डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. ती सर्व मुले अत्यंत गंभीर स्थितीत होती. इथे आणण्यापूर्वीच त्यांच्या श्वासोच्छवासात अडथळा निर्माण झाला होता,' अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा - संपूर्ण जगच अधिकाधिक राष्ट्रवादी बनत आहे - जयशंकर
'दुमजली इमारत असून काही ठिकाणी प्रकाशासाठी मेणबत्त्या पेटवण्यात आल्या होत्या. येथील तळमजल्याला आग लागली. एक खोली वगळता ती सर्वत्र पोहोचली. मात्र, दुसऱ्या मजल्यावरील खोल्यांमधील मुले धुरामुळे गुदमरली,' अशी माहिती त्यांनी दिली.
पोर्ट-औ-प्रिन्सच्या पेशन-व्हिल्ले या उपनगरात हे अनाथालय असून याला कार्य सुरू ठेवण्याचा परवाना नाही. हैती या गरीब देशामध्ये सध्या ७५४ अनाथालये असून यातील केवळ ३५ चालकांकडे अनाथालय चालवण्याचा परवाना आहे, अशी स्थिती आहे.
हेही वाचा - मालीमध्ये हिंसाचार, मृतांचा आकडा ३१ वर