ब्राझिलिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी आज (बुधवार) ब्राझीलमध्ये पोहचणार आहेत. ११ व्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने जगातील मोठ्या ४ अर्थव्यवस्थांशी संबध सुधारण्यासाठी भारत नक्कीच प्रयत्न करेल. डिजिटल इकॉनॉमी, विज्ञान-तंत्रज्ञान आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी सहकार्य या महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान मोदी उद्योग क्षेत्रातील शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत.
'नाविन्यपूर्ण भविष्यासाठी आर्थिक विकास' ही ११ व्या ब्रिक्स परिषदेची मुख्य संकल्पना आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा मिळून ब्रिक्स देशांचा गट बनला आहे. या पाचही देशातील उद्योग क्षेत्रातील शिष्ठमंडळ परिषदेच्या निमित्ताने ब्रिक्स चर्चेत सहभागी होणार आहेत.
ब्राझीलची राजधानी ब्राझिलीया येथे पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदी आज दिवसभर द्विपक्षीय चर्चा आयोजित करणार आहेत. तसेच संध्याकाळी 'ब्रिक्स बिझनेस फोरम' चर्चासत्रात सहभागी होणार आहे. ब्राझील आणि भारतामध्ये पुर्वापार घनिष्ठ संबध आहेत. संरक्षण, व्यापार, सुरक्षा, शेती, उर्जा, आणि अंतराळ क्षेत्रांमध्ये भारत आणि ब्राझिलचे संबध आहेत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
दुसऱ्या दिवशी ब्रिक्स समुहातील देशांसोबत मोदी बंददरवाज्याआड चर्चा करणार आहेत. सद्य स्थितीत राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे पालन करताना असणारी आव्हाने आणि संधी, या विषयावर ब्रिक्स नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
ब्रिक्स समुहामधील देशांमध्ये जगातील ४२ टक्के लोकसंख्या राहते. तसेच जागतिक जीडीपीच्या २३ टक्के जीडीपी ब्रिक्समधून येतो. तसेच जागतिक व्यापारापैकी १७ टक्के व्यापारामध्ये ब्रिक्स देशांचा वाटा आहे. ११ व्या ब्रिक्सच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींची ही दुसरी ब्राझील भेट आहे. याआधी जानेवारी २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी ब्राझीलच्या नवनियुक्त पंतप्रधान बोलसोनारो यांना जी- २० परिषदेच्या निमित्ताने भेटले होते.