यवतमाळ - कोरोनाच्या काळात जिल्ह्यात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांकडून अतिरिक्त बिल आकारणी केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पाच रुग्णालयांना आकारलेले अतिरिक्त बिल संबंधित रुग्णांना परत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. शहरातील उजवणे हॉस्पिटल, राठोड हॉस्पिटल, शहा हॉस्पिटल, साईश्रध्दा हॉस्पिटल आणि धवणे हॉस्पिटल या रुग्णालयांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाकडे आल्या तक्रारी-
जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांकडून मनमानी बिल घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयात लेख निरीक्षक नियुक्त केले असता, त्यांनी बिलांच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार प्रशासनाने अतिरिक्त बिलांबाबत संबंधित रुग्णालयांना 48 तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. मात्र संबंधित रुग्णालयाचे खुलासे समाधानकारक नसल्यामुळे शहरातील पाच खासगी रुग्णालयांना अतिरिक्त आकारणीचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले.
24 रुग्णांकडून एक लाख 91 हजार अतिरिक्त
शहरातील उजवणे रुग्णालयाने वेगवेगळ्या सात रुग्णांकडून एकूण 81 हजार 700 रुपये अतिरिक्त आकारले होते. तसेच राठोड हॉस्पिटलमध्ये चार वेगवेगळ्या रुग्णांकडून 18 हजार 600 रुपये, शहा हॉस्पिटलमध्ये पाच रुग्णांकडून 16 हजार 600 रुपये, साईश्रध्दा हॉस्पिटलमध्ये सात रुग्णांकडून 47900 रुपये तर धवणे हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाकडून 26 हजार रुपये अतिरिक्त स्वरुपात आकारण्यात आले होते.
तर दंड आकारणार
या पाचही रुग्णालयात एकूण 24 रुग्णांकडून एक लाख 90 हजार 800 रुपये अतिरिक्त घेतल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णालयांनी सात दिवसात रक्कम परत न केल्यास सात दिवसानंतर आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत प्रतिदिवस एक हजार रुपये याप्रमाणे दंडाची रक्कम आकारण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश दिले आहे.