जळगाव - जिल्हा कारागृहातून सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून तीन आरोपी पळाल्याची घटना आज (शनिवारी) सकाळी साडेसात वाजता घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्हा कारागृहात यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कारागृह प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुशील अशोक मगरे (रा. पहूर, ता. जामनेर), गौरव विजय पाटील (रा. तांबापुरा, अमळनेर) आणि सागर संजय पाटील (रा. पैलाड, अमळनेर) अशी कारागृहातून पळालेल्या आरोपींची नावे आहेत.
कारागृहात दररोज सकाळी कामांसाठी ज्याप्रमाणे आरोपींना सोडले जाते. तसेच शनिवारी देखील आरोपींना सोडण्यात आले होते. मात्र, यावेळी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून, हे तिघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, कारागृहात आत आणि बाहेर अशी दुहेरी सुरक्षा व्यवस्था असताना आरोपी पळाले कसे? हे मात्र, अनुत्तरीत आहे.
आरोपींमध्ये एका बडतर्फ पोलिसाचा समावेश - सुशील मगरे हा काही दिवसांपूर्वीच पोलीस दलातून बडतर्फ झालेला आहे. पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने दरोडा टाकला होता. एलसीबीच्या पथकाने त्याला डिसेंबर 2019 मध्ये बडोदा येथून अटक केली होती. त्यानंतर तो येथील जिल्हा कारागृहात होता.