वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूच्या प्रसरारामुळे जगावर आरोग्य आणीबाणी आली असून तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 35 हजार 223 कोरोना रुग्ण आढळले असून 5 हजार 643 जणांचा मृत्यू झाला आहे.
अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 44 लाख 14 हजार 237 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 लाख 4 हजार 151 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 86 लाख 6 हजार 611 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
चीनमधील वुहान प्रांतातून कोरोना विषाणूच्या प्रसारास खरी सुरवात झाली होती. चीनमध्ये विषाणूचा प्रसार अटोक्यात आणला. मात्र, याचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार अमेरिकेत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 लाख 33 हजार 180 ऐवढी असून 1 लाख 42 हजार 870 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये 20 लाख 75 हजार 124 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 78 हजार 735 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10 लाख 77 हजार 618 झाली आहे.
दरम्यान, जगभरातली देश कोरोनावर लस शोधण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. कोरोनावर लस विकसीत करत असल्याचा दावा उत्तर कोरियाने देखील केला आहे. तसेच युएईमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आली आहे. तसेच भारतामध्ये स्वदेशी विकसित लस 'कोव्हॅक्सिन'ची मानवी क्लिनिकल चाचणी घेण्यास सोमवारपासून सुरवात करण्यात येणार आहे.