मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर रियाच्या संकटात वाढ झाली आहे. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आता ईडीने वेगाने तपास सुरू केला असून रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला होता. यानुसार रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात हजर झाली आहे.
सुशांत Vividrage RhealityX Pvt Ltd आणि Front India for World Foundation या दोन कंपन्यांचा डायरेक्टर होता. ईडीकडून या दोन कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित तपास करण्यात येत आहे. मुंबईतील उलवे परिसरातील येथील 'साई फॉर्च्यून' इमारतीतील फ्लॅट नंबर ५०३ येथे या दोन्ही कंपन्या रजिस्टर होत्या. या दोन्ही कंपन्याचे संचालक म्हणून सुशांतसह रिया चक्रवती आणि तिच्या भावाची नावे आहे. या दोन्ही कंपनीचा रजिस्टर पत्ता नवी मुंबईतील एका फ्लॅटचा असून हा फ्लॅट रिया चक्रवर्ती हिच्या वडिलांच्या नावावर आहे. हा फ्लॅट रियाच्या वडिलांच्या नावावर का आहे, हा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.
याआधी ईडीकडून सुशांतसिंह राजपूत याचा चार्टर्ड अकाऊंटंट व सुशांतसिंह राजपूतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांची चौकशी करण्यात आलेली आहे. यानंतर सुशांतसिंह राजपूत याची मैत्रिणी रिया चक्रवर्ती हिला चौकशीसाठी ईडी कडून समन्स बजावण्यात आला आहे. आता रिया चक्रवर्तीला ईडी कार्यालयात येऊन चौकशीला सामोर जावे लागणार आहेत. तसेच, सुशांतच्या नावावर 4 बँकेत खाती होती. या 4 बँकांच्या माध्यमातून सुशांतकडे तब्बल 18 कोटी रुपये होते. मात्र, टप्प्याटप्याने यातील जवळपास 15 कोटीहून अधिक रक्कम ही वेगवेगळ्या खात्यांवर वळविण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील बराचसा पैसा हा रिया चक्रवर्ती हिच्या बँक खात्यावर गेल्याचा संशय ईडीला आहे. याआधी ईडीने सुशांतच्या चार्टर्ड अकाउंटंटचा जबाब नोंदविला होता. या 2 कंपनीच्या व्यवहारात बरीच अनियमितता असण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट फायदा रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना झाला आहे, असा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे.