सांगली - नाराज असलेले रयत क्रांती संघटनेने अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची मनधरणी करण्यात अखेर भाजपाला यश आले आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदार संघातून रयत क्रांती संघटनेने माघार घेत भाजपाला पाठिंबा दिला आहे. सांगलीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सदाभाऊंची नाराजी दूर करण्यात अखेर यश-
पुणे पदवीधर निवडणुकीत रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा करून भाजपासमोर आव्हान उभे केले होते. त्याचबरोबर राजू शेट्टी यांना साद घालत खोत यांनी भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज सांगलीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीला फायदा होऊ नये, या दृष्टीने भाजपाला मदत करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यासोबत यापुढील काळात सदाभाऊ खोत आणि रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही देत पुणे पदवीधर निवडणुकीतून उमेदवारी मागे घेण्याची विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार रयत क्रांती संघटनेने पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मागे घेत असल्याची भूमिका बैठकीत जाहीर केली.
भाजपाला पाठिंबा-
एका घरात नवरा-बायकोच्या तक्रारी असतात व इथे तर दोन वेगवेगळ्या संघटना एकत्र आल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या अनेक तक्रारी होत्या. तसेच संघटना म्हणून त्यांना लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवता आली नाही. त्यामुळे पदवीधर निवडणूक लढवावी, अशी रयतच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. आता या परिस्थितीमध्ये भाजपाचा उमेदवार मागे घेणे शक्य नाही. त्यामुळे भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती सदाभाऊ खोत यांना केली. त्यानुसार मंगळवारी रयत क्रांती संघटना आपला उमेदवार मागे घेईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विरोधकांचे खालच्या पातळीचे राजकारण-
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विरोधाकांनी भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या विरोधात संग्राम देशमुख नावाचे एक उमेदवार उभे केले आहे. हे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण सुरू असल्याची टीका पाटील यांनी केली.
सदाभाऊ यांना मानाचे स्थान-
भारतीय जनता पार्टीत सदाभाऊ खोत यांना मानाचे स्थान आहे. यापुढील काळात पक्षात आणि सत्तेमध्येही रयत आणि सदाभाऊ यांना सन्मान देण्यात येईल. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सदाभाऊ खोत यांच्यावर विशेष प्रेम आहे, असे मतही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
हेही वाचा- कौतुकास्पद..! चौदा किलोमीटर पायपीट करून अंगणवाडी सेविका पोहचवते पोषण आहार