मुंबई - कोरोना व्हायरसचे संक्रमन थांबवण्यासाठी सर्व स्तरातून उपाययोजना केल्या जात असताना एक चिंतेची बातमी समोर येत आहे. राज्यात लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे म्हणून रस्त्यावर 24 तास पहारा देणाऱ्या राज्य पोलीस खात्यातील 456 पोलिसांना कोरोनाची लागन झाली आहे. आतापर्यंत 42 पोलीस अधिकारी व 414 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत मुंबईत 3 पोलिसांचा तर पुण्यात 1 पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. राज्यात लॉकडाऊन काळात 95 हजार गुन्हे दाखल झाले आहेत.
राज्याभरात 22 मार्च ते 5 मे या काळात 95 हजार 678 गुन्हे दाखल झाले असून, 18 हजार 722 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. क्वारंटाईन नियम मोडणाऱ्या 633 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, तब्बल 2 लाख 11 हजार 638 व्यक्ती क्वारंटाईन करण्यात आल्या आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 184 घटना घडल्या असून या प्रकरणी 663 जणांना अटक करण्यात आली आहे.
राज्यभरात लॉकडाऊनच्या कालावधीत पोलीस विभागाच्या 100 या नियंत्रण नंबरवर आतापर्यंत 84 हजार 945 फोन आले आहेत. अवैद्य वाहतूक संदर्भात 1 हजार 279 गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल 55 हजार 71 वाहन जप्त करण्यात आली आहेत.