मुंबई - मराठी रंगभूमी आमि चित्रपटातील प्रतिभावंत अभिनेता प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ६४ व्या वर्षी राहत्या घरी निधन झालं आहे. मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी ही त्यांची काही गाजलेली नाटके होती. त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन जगतावर शोककळा पसरली आहे.
मुंबईतील गिरगाव भागात वाढलेल्या प्रदीप पटवर्धन यांना विद्यार्थी दशेपासूनच रंगभूमीची आवड निर्माण झाली. महाविद्यालयीन एकांकिकामधून काम करीत अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या. सहज अभिनय करण्यात पारंगत असलेल्या पटवर्धन यांनी अभिनय हेच आपले करियर बनवले आमि व्यावसायिक रंगभूमीवर लीलया वावर केला. मोरुची मावशी या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजले. या नाटकाचे महाराष्ट्रभर आणि दुसऱ्या राज्यातही प्रयोग गाजले. ‘मोरुची मावशी’ नाटकाच्या सुमारे दीड हजार प्रयोगात प्रदीप पटवर्धन यांनी भूमिका साकारली होती.
रंगभूमीसोबतच प्रदीप पटवर्धन यांनी टीव्ही मालिका व चित्रपटातूनही भूमिका केल्या. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ असा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिलंय, ''मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.''
हेही वाचा - मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड!