मुंबई : कोरोनामुळे मागील २ वर्ष रखडलेले काही मानाचे पुरस्कार सोहळे यंदा पार पडले. यात सर्वात प्रतिष्ठित असलेला ‘मराठी फिल्मफेअर पुरस्कार’ हा सोहळा हल्लीच पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी यावेळी हजर होती. ‘जयंती’ सिनेमाला फिल्मफेअर पुरस्कारांची ५ नामांकने मिळाली होती. त्यातील पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ऋतुराजला प्रदान करण्यात आला.
जयंती सिनेमाला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे आणि त्यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ‘आयुष्यातला पहिला पुरस्कार आणि तोही फिल्मफेअरचा, त्यामुळे आनंद गगनात मावत नाहीये,” अश्या भावना ऋतुराज वानखेडेने व्यक्त केल्या. लॉकडाऊन नंतर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट "जयंती" प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून गेला. सदर सिनेमा चित्रपटगृहात तब्बल १० आठवडे चालला.
ऋतुराज वानखेडेने केली अनेक नाटके
ऋतुराज वानखेडे हा नागपूरस्थित अभिनेता असून त्याने अनेक नाटकं गाजवली आहे. परंतु, जयंती हा त्याचा पहिलाच चित्रपट असल्याने त्याला या चित्रपटापासून खूप अपेक्षा होत्या. चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्याने अभिनय आणि पर्सनॅलिटीवर विशेष लक्ष दिले होते. आणि यात तो यशस्वीदेखील झाला. लोकांनी संत्या हे कॅरेक्टर अक्षरशः डोक्यावर घेतले. याचीच पोचपावती म्हणून त्याला यंदाचा प्रतिष्ठित ‘मराठी फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला.जयंती ही माझ्या आयुष्यातील पहिली फिल्म! अर्थात मला या चित्रपटातून भरपूर अपेक्षा होत्या. संत्याचं कॅरेक्टर मी मनापासून साकारलं आणि याचाच निकाल म्हणून आज माझ्या हातात ही "ब्लॅक लेडी" आहे. हे पात्र साकारण्यासाठी मीच पात्र असेल असा विश्वास ज्यांनी ठेवला ते दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांचा मी कायम ऋणी राहीन. अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा - 38 krishna villa : मनोरंजनसृष्टीत ३८ वर्षे कार्यरत असलेल्या डॉ. गिरीश ओक यांचे ५० वे नाटयपुष्प, ‘38 कृष्ण व्हिला’!