'तुझे आहे तुजपाशी'- एक अजरामर नाट्यकृतीः 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' असा लौकिक असलेल्या दिवंगत पु ल देशपांडे यांची लाडकी आणि गाजलेली नाट्यकृती म्हणून 'तुझे आहे तुजपाशी' नाटक ओळखलं जातं. भाई अर्थात पुलंनी 1957 साली हे नाटक लिहून हातावेगळं केलं. यातले चिरतरुण काकाजी, विरक्त आयुष्य जगणारे आचार्य, आधी आचार्यांचा विरोधक आणि नकळत अनुयायी झालेला श्याम, देशसेवेला वाहून घेतलेली श्यामची मोठी बहीण उषा, उषाचा प्रियकर डॉ सतीश, देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीकारकाची ध्येयवादी मुलगी गीता ही नाटकातली प्रमुख पात्रं नाट्यरसिकांच्या जणू घरातले सदस्यच बनून गेले. जयंत सावरकर, रवी पटवर्धन, गिरीश ओक, अविनाश खर्शीकर या अभिनेत्यांच्या सदाबहार अभिनयानं नटलेल्या या नाटकाचे 1978 ते 2016 या कालावधीत अनेक प्रयोग झाले. गिरीश ओक यांनी त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात वेगवेगळ्या वर्षांत नाटकातला डॉ. सतीश आणि श्याम या व्यक्तिरेखा सााकारल्या होत्या.
बहुरंगी गिरीश ओकः 'तुझे आहे तुजपाशी' हे नाटक म्हणजे शब्दोच्चारावर हुकुमत गाजवणाऱ्या जयंत सावरकरआणि खणखणीत आवाजाचे धनी रवी पटवर्धन दिवंगत दिग्गज नटांच्या अभिनयाची जुगलबंदी ठरली. त्यांच्याबरोबरच डॉ. सतीश आणि श्याम या भूमिकांचंही आगळं महत्त्व आहे. या दोन्ही व्यक्तिरेखा तशा परस्परभिन्न. दोन्ही भूमिकांचे आलेख वेगळे. डॉ. सतीश साकारणाऱ्या नटाला श्याम साकारणं आणि श्याम साकारणाऱ्या नटाला डॉ. सतीश साकारणं तसं अवघडच. पण गिरीश ओक यांनी आपल्या अभिनयाने हे अवघड काम सोपं करुन दाखवलं. क्रिकेट सामन्यात जेव्हा एखादा कसलेला फलंदाज कठीण खेळपट्टीवर चौकार, षटकारांची आतषबाजी करतो तेव्हा खेळपट्टी फलंदाजाला धार्जिणी आहे, असं वाटायला लागतं. नेमकं हेच गिरीश ओक यांच्या अभिनयानं दाखवून दिलं.
आव्हान पेलण्याची सवयः गिरीश ओक यांनी आपल्या अभिनय प्रवासात 'दीपस्तंभ', 'श्री तशी सौ', 'सुंदर मी होणार', 'यू टर्न' सारख्या नाटकांमधून विविधरंगी भूमिकांना न्याय दिला. सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या '38 कृष्णा व्हिला' मधल्या त्यांच्या कामाचंही कौतुक होतंय. 'कुसुम मनोहर लेले' या दिवंगत विनय आपटे दिग्दर्शित नाटकात गिरीश ओक आणि संजय मोने यांनी नायक, खलनायक आलटून पालटून साकारले होते. दिवंगत नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांनी अजरामर केलेल्या 'तो मी नव्हेच' मधला लखोबा लोखंडे सुद्धा त्यांनी बारकाव्यांसह साकारला. सुमारे चार दशकांच्या अभिनयप्रवासात 'काकाजी'च्या निमित्ताने ते आता नव्या-जुन्या नटांना, भूमिका जगणं म्हणजे काय? हे पुन्हा एकदा सप्रमाण दाखवण्यासाठी सज्ज होत आहेत.
हेही वाचा -
बनारस हिंदू विद्यापीठात 'जाणता राजा'; 300 कलावंत सादर करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित नाटक