हैदराबाद - ईटीव्ही ग्रुपकडून बालभारत हे नवीन चॅनल आज लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण टीव्हीवर केवळ हिंदी आणि इंग्लिशमध्ये पाहिलेले कार्टून आता आपल्याला आपल्या मायबोलीत, म्हणजेच मराठीत पाहता येणार आहेत. हे चॅनल म्हणजे मराठी लहान मुलांसाठी एक विशेष भेट आहे! ईटीव्ही ग्रुपचे चेअरमन रामोजी राव यांच्या हस्ते या चॅनेलचे उद्घाटन पार पडले.
कार्टून पाहा आता मराठीत..
या चॅनलवर अॅनिमेटेड सीरीज, कार्टून प्रोग्राम आणि विविध रोमांचक सीरीअल्स पाहता येणार आहेत, तेही आपल्या मराठीत! गेल्या कित्येक दिवसांपासून या चॅनलच्या लाँचिंगची प्रतिक्षा करण्यात येत होती.
काही ओळखीची आणि काही नवीन पात्रं आपल्या भेटीला..
मोगली, किंगकाँग आणि पीटर पॅन या ओळखीच्या पात्रांसोबतच, मिली-जुली या बहिणींची आंबट-गोड मालिका; तसेच किटी, आणि अभिमन्यू ही नवीन पात्रंही तुमच्या भेटीला येणार आहेत. यासोबतच अॅनिमल इमर्जन्सी, पॅकमॅन अशा नवीन मालिकाही या चॅनलवर पहायला मिळणार आहेत.
विदेशी मालिकांसह स्वदेशी संस्कृतीचेही दर्शन..
ईटीव्ही ग्रुपच्या या उपक्रमामुळे जागतिक स्तरावर गाजलेल्या अॅनिमेशन शोजसोबतच भारतातच तयार झालेल्या कार्टून्सचा आनंदही मुलांना आपल्या मायबोलीमध्ये घेता येणार आहे. केवळ मालिकाच नाही, तर अॅनिमेशन चित्रपटही आपल्या भाषेत उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे केवळ विदेशातीलच नाही, तर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे स्वदेशी कार्टूनही या चॅनल्सवर पहायला मिळणार आहेत.
तब्बल ११ भाषांमध्ये पाहता येणार कार्टून्स..
विशेष म्हणजे, मराठीप्रमाणेच इतर ११ भाषांमध्येही एक-एक चॅनल लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, उडिया, पंजाबी, तेलुगु, तमिळसह इंग्रजी या प्रमुख भाषांचा समावेश आहे.
ईटीव्ही बालभारत आपण 'टाटा स्काय'वर चॅनल क्रमांक ६८०; तर 'डिश टीव्ही'वर चॅनल क्रमांक ९९० वर पाहू शकता.