मुंबई - काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘धर्मवीर’ अजूनही चित्रपटगृहात गर्दी खेचतो आहे. शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून त्यात एकनाथ शिंदे यांचीही सामान्य माणसांना मदत करण्याची वृत्ती अधोरेखित करण्यात आली आहे. आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असले तरी तळागाळातील लोकांना मदत करण्याचे त्यांचे कार्य सुरूच आहे. अभिनेता मंगेश देसाई यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा वाहिली असून एकनाथ शिंदे यांचा त्यांना भरभक्कम पाठिंबा होता.
आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून - एकनाथ शिंदे आणि मंगेश देसाईं यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन नुकतेच घडले. आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुलावर वैद्यकीय उपचार करू न शकणाऱ्या रंगभूषा कलाकाराला देसाई यांनी आर्थिक मदत केली. विशेष म्हणजे, ही आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रंगभूषा कलावंत विजय हर्णे यांच्या आजारी मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले. पण मुलावर उपचार करण्याइतकी हर्णे यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे मित्रमंडळी-ओळखीच्यांकडून आर्थिक मदत मिळवून उपचार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना काही पैसे मिळाले नाहीत. उपचाराअभावी मुलाची तब्येत खालावत होती.
अखेर त्यांनी त्यांच्या परिचयाचे असलेले दिग्दर्शक अमोल भावे यांना मदतीसाठी संपर्क साधला. भावे यांनी हर्णे यांना मंगेश देसाई यांच्याशी गाठ घालून दिली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मंगेश देसाई यांनी मदत करण्याचे आश्वासन न देता लगेचच उपचार सुरू करून दिले. त्यानंतर मुलाची तब्येत सुधारल्यावर आणि डॉक्टरांनी रुग्णालयातून सोडताना रुग्णालयाचे बिलही भरले. याबाबत हर्णै म्हणाले, की मुलावर व्यवस्थित उपचार होऊन तो सुखरूप घरी परत आला याचा आनंद आहे. या काळात मंगेश देसाई सातत्याने संपर्क साधत होते, मुलाच्या तब्येतीची चौकशी करत होते.
‘रुग्णालयातून घरी परतल्यावर मदत केल्याबद्दल आभार मानण्यासाठी यांनी मंगेश देसाई यांना फोन केला. त्यावेळी ते म्हणाले, की मी केवळ निमित्तमात्र आहे, ही आर्थिक मदत मी नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आणि मंगेश देसाई यांचे आभार शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मी त्यांचा जीवनभर ऋणी राहीन,’ असे विजय हर्णे यांनी सांगितले.