मुंबई - Prashant Damle : गेली चार दशकं मनोरंजनसृष्टीत वावरणारे जेष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात मागे हटत नाहीत. नाट्यरसिकांच्या प्रेमाचं संचित ऊर्जारुपात प्रशांत दामले यांची सोबत कायम करत आलंय. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर नाट्यरसिकांचं प्रेम म्हणजे मोठा पुरस्कार! रंगभूमीवर सतत सळसळत्या उत्साहाने वावरणाऱ्या या प्रतिभावान रंगकर्मीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रशांत दामले यांना 'विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार' जाहीर झाला असून त्याबद्दल त्यांनी आता आनंद व्यक्त केला आहे. नुकताच त्यांनी 'एका लग्नाची पुढची गोष्ट' आणि ‘नियम व अटी लागू’ या दोन नाटकांचा अमेरिका दौरा दणक्यात पूर्ण केला.
अमेरिकेत झाला नाटकाचा प्रयोग : 'नियम व अटी लागू' हे 'प्रशांत दामले फॅन फाउंडेशन'ची निर्मिती असलेल्या आणि 'एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या दोन नाटकांचे ६ आठवड्यांत २१ 'हाउसफुल्ल' प्रयोग सादर करण्यात आले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील हिस्सा अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळ शैक्षणिक निधी उभारणीसाठी देण्यात आला आहे. प्रशांत दामले आणि त्यांची टीम अमेरिकेत रंगभूमी गाजवत असतानाच त्यांना 'विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार' जाहीर झाला. हे कळल्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं, अशी स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली नसेल, तरच नवल!
'बहुरुपी' प्रशांत दामले : प्रशांत दामले यांनी 'मोरुची मावशी', ' गेला माधव कुणीकडे', 'सुंदर मी होणार', 'प्रियतमा', 'लेकुरे उदंड जाहली', 'सारखं काहीतरी होतंय' यासारख्या नाटकांतून रंगभूमी गाजवली रंगभूमीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. मध्यंतरी उद्भवलेल्या आजारातून सावरत प्रशांत दामले यांनी जिगर दाखवत रंगभूमीची सेवा अखंड सुरु ठेवली. त्यांच्या 'गेला माधव कुणीकडे' मधील 'अरे हाय काय आणि नाय काय' या संवादाला जागत त्यांनी पुन्हा रंगमंचावर उडी घेतली आणि धुमाकूळ घातला. ते नाट्यरसिकांसाठी नाटकं सादर करण्याबरोबरच बॅकस्टेज कामगारांच्या उत्पन्नात खंड पडू नये, याचीही काळजी घेत असतात. पुण्यात प्रशांत दामले यांची अभिनय शिकवण्याची एक प्रशिक्षण संस्था देखील आहे.
५ नोव्हेंबरला होणार रंगणार कार्यक्रम : नाट्यविश्वात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार प्रशांत दामले यांना जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी घोषणा केली असून हा पुरस्कार सोहळा येत्या ५ नोव्हेंबरला संपन्न होणार आहे.
हेही वाचा :