नवी दिल्ली - वरुण धवनचा नुकताच अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेल्या 'बवाल' चित्रपट नव्या वादाच्या भोवऱ्यात फसताना दिसत आहे. ज्यू समुहाच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनेने लाखो लोकांच्या दुःखाचे क्षुल्लकीकरण केल्याबद्दल प्राईम व्हिडिओवर टीका केली असून हा चित्रपट ओटीटीवरुन काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यामुळे होलोकॉस्टचा वापर करून वैवाहिक विसंवादाची कहाणी कथन करणाऱ्या 'बवाल' चित्रपटाभोवती वादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सायमन विसेन्थल सेंटर (SWC) या होलोकॉस्टच्या बळींच्या स्मृतीला समर्पित संस्थेने नाझी होलोकॉस्टचे एक कथानक एक साधन म्हणून वापर केल्याबद्दल 'बवाल' चित्रपटावर टीकास्त्र सोडले आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'बवाल' चित्रपटाची कथा अजय दीक्षित नावाच्या एका इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकाची आहे. त्याचे निशा नावाच्या मुलीशी लग्न होते आणि त्यांच्या नात्यात कटूता येते. इतिहासाचा शिक्षक असूनही त्याचे दुसऱ्या महायुद्धाबद्दलचे ज्ञान खराब असते. याबद्दल प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला तो थोबाडीत मारतो आणि त्याच्या आयुष्यात बवाल निर्माण होतो. ज्या विद्यार्थ्याला त्याने मारले आहे तो मुलगा त्या विभागाच्या लोकप्रिय आमदाराचा मुलगा आहे. आमदार शाळेच्या प्रिन्सिपलला धारेवर धरतो आणि शिक्षकाच्या इतिहास विषयक ज्ञानाची परीक्षा घ्यायचे ठरवतो. दरम्यान शिक्षकाला एक महिन्यासाठी निलंबीत केले जाते. या गोष्टीचा फायदा उठवायचा ठरवून वरुण धवन साकारत असलेला अजय दीक्षित पत्नी निशा ( जान्हवी कपूर ) सोबत दुसरे महायुद्धाच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना विषय शिकवण्याचे ठरवतो आणि त्यानुसार तो पॅरीसला पोहोचतो. या दरम्यान तो औशविट्झ आणि अॅन फ्रँकच्या आम्सटरडॅममधील घरासह दुसऱ्या महायुद्धातील प्रमुख स्थळांना पत्नीसह भेटी देतो. या प्रवासात पती पत्नी म्हणून दोघांमध्ये असलेले मतभेद ते कसे सोडवतात याची कथा सांगणारा हा चित्रपट अनेक दृश्यांमध्ये होलोकॉस्टच्या ग्राफिक आठवणीतून उलगडत जातो.
या चित्रपटातील एका दृष्यात शिक्षक अजय दीक्षित पत्नीसह नायक ऑशविट्झमधील गॅस चेंबरमध्ये प्रवेश करतो आणि गुदमरतो, असे दाखवण्यात आले आहे. या आठवड्याच्या सुरूवातीलाच सायमन विसेन्थल सेंटरने चित्रपटावर आक्षेप घेत आपल्या निवेदनात म्हटलंय की, 'या चित्रपटात हिटलर हा एका मानवी लोभाचे प्रतीक म्हणून वापरले आहे. यात नायक पत्नीला म्हणतो की, 'आपण सर्वजण तोडे थोडे हिटलर सारखेच असतो, हो की नाही?' ऑशविट्झ हे कोणतेही रुपक असू शकत नाही. ते एक मानवी क्रोर्याच्या क्षमतेचे एक उत्तम उदाहरण आहे', असे सायमन विसेन्थल सेंटरचे संचालक रब्बी अब्राहम कूपर यांनी म्हटलंय. हिटलरच्या या नरसंहारात ६० लाख ज्यूंच्या आणि इतर लाखो लोकांच्या झालेल्या क्रूर हत्येचा दिग्दर्शक नितीश तिवारीच्या कृतीने अपमान झाला असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटलंय.
'ज्यूंच्या नरसंहाराचे आणि नाझींच्या क्रोर्याचे काल्पनिक दर्शन घडवत चित्रपटासाठी केवळ जन संपर्क वाढवण्याचा काम चित्रपटात केले आहे. त्यामुळे प्राईम व्हिडिओने नाझींनी घेतलेल्या लाखो बळींच्या दुःखाचे आणि क्रूर हत्येचा हा क्षुल्लक प्रकार ताबडतोब काढून टाकावा व 'बवाल' चित्रपटाचे प्रसारण रोखावे', असेही निवेदनात म्हटले आहे.
याबाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी पीटीआय वृत्त संस्थेने प्राईम व्हिडिओ आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी यावर कोणतेही भाष्य करणे टाळले आहे. २१ जुलै रोजी चित्रपटाच्या रिलीज समोर असताना नितेश तिवारी यांनी म्हटले होते की, चित्रपटाच्या कथेला पुरक असणारे इतिहासतील काही प्रसंग यात समाविष्ठ करण्याचा प्रयत्न केला आहे. पात्रांच्या नातेसंबंधाबाबत लागू होणारे प्रसंगांचा यात समावेश करण्यात आल्याचेही, त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा -
१. Guns And Gulaabs Trailer : 'गन्स अँड गुलाब' ची पहिली झलक, दुल्कर सलमानने केली ट्रेलर रिलीजची घोषणा