मुंबई - मराठी सिनेसृष्टी भारतातील अग्रगण्य समजली जाते. आशयपूर्ण सिनेमा बनवणे ही त्याची खरी ओळख. तांत्रिक अंगानेही मराठी सिनेमा प्रगत बनलाय. मुळात भारतीय सिनेसृष्टीचा पायाच मराठी माणसाने घातलाय हे आपण जाणतो. दादासाहेब फाळके हे भारतीय सिनेमाचे जनक आहेत. त्यानंतर कलामहर्षि बाबूराव पेंटर यांनीही फाळकेंच्या समकालात जोरदार सिनेमांची निर्मिती सुरू ठेवली होती. त्यांच्याच महाराष्ट्र फिल्म कंपनीत व्ही शांताराम या सृजनशील दिग्दर्शकाची जडण घडण घडली आणि मराठीतील पहिला बोलपट बनवण्याची कमाल शांताराम यांनी करुन दाखवली. ६ फेब्रुवारी १९३२ या दिवशी चित्रपट महर्षी व्ही शांताराम दिग्दर्शित अयोध्येचा राजा हा सिनेमा मुंबईत प्रदर्शित झाला होता.
दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट १०१३ मध्ये बनवला होता. मात्र हा मुकपट होता. त्यानंतर १९ वर्षांनी चित्रपटातील पात्रांना आवाज मिळाला आणि १९३१ मध्ये आलाम आरा हा पहिला बोलपट बनला. त्यानंतर वर्षभरातच १९३२ मध्ये पहिला बोलपट आयोध्येचा राजा व्ही. शांताराम यांनी बनवला होता.
‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका केल्या होत्या. आजही हा सिनेमा सिनेसृष्टीतला मैलाचा दगड मानला जातो कारण मराठी सिनेमा बोलू लागला तो याच चित्रपटामुळे.
पौराणिक कथेवर आधारित होता ‘अयोध्येचा राजा’ - राजा हरिश्चंद्र, तारामती आणि त्यांचा मुलगा रोहिदास यांच्या कथेवर आधारित हा सिनेमा होता. वसिष्ठ ऋषींनी राजा हरिश्चंद्राचं कौतुक केल्याने विश्वामित्र ऋषी हरिश्चंद्राची परीक्षा घेण्याचं ठरवतात. राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडतं आणि त्यात तो आपलं राज्य विश्वामित्रांना दान करतो असं त्याला दिसतं. या स्वप्नाच्या दुसऱ्याच दिवशी विश्वामित्र राजा हरिश्चंद्राच्या दरबारी येतात आणि त्याला वचनाची आठवण करुन देतात. स्वप्नात दिलेलं वचनही राजा हरिश्चंद्र पूर्ण करतो. त्यानंतर विश्वामित्र हर तऱ्हेने हरिश्चंद्राची परीक्षा घेतात. मात्र सत्याचा मार्ग निवडलेला राजा हरिश्चंद्र आपल्या जिद्दीवर अटळ राहतो. त्यानंतर भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होतात आणि राजा हरिश्चंद्राला त्याचा राज्य परत मिळते आणि विश्वामित्रही आनंदाने त्याला आशीर्वाद देतात.
या चित्रपटाचे वैशिष्ठ्य होते ते म्हणजे यातील १५ गाणी. चित्रपटाची कथा गाण्यांच्या माध्यामातून पुढे सरकत जाते आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाते.
हेही वाचा - चारू असोपा आणि राजीव सेन पुन्हा एकत्र? तिच्या लेटेस्ट फोटोवरुन चाहत्यांचा तर्क