मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ( Sushant Singh Rajput ) मृत्यूला दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. 14 जून 2020 रोजी, त्याने त्याच्या मुंबईतील पश्चिम उपनगरातील वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. यानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली. ज्या फ्लॅटमध्ये तो मृतावस्थेत आढळला त्या फ्लॅटला भाडेकरू मिळत नसल्याची माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती. हा फ्लॅट गेल्या अडीच वर्षांपासून रिकामाच होता व त्यात कोणीही राहण्यास तयार नव्हते. या फ्लॅटच्या ब्रोकरने एक व्हिडिओ ट्विट करत लिहिले होते की, तो फ्लॅट दरमहा 5 लाख रुपये भाड्याने उपलब्ध आहे. रफिक मर्चंट असे या ब्रोकरचे नाव आहे. या फ्लॅटचा मालक एनआरआय आहे. जेव्हापासून सुशांतने जगाचा निरोप घेतला तेव्हापासून त्याचे मुंबईतील अपार्टमेंट ओसाड पडले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून या घरात एकही भाडेकरु फिरकला नव्हता. आता या फ्लॅटला नवीन भाडेकरू मिळाला आहे.
लोकांना याची भीती वाटत होती - सुशांत सिंग मुंबईतील मॉन्ट ब्लँक अपार्टमेंटमध्ये राहत होता आणि या फ्लॅटसाठी महिन्याला साडेचार लाख रुपये देत होता. हा डुप्लेक्स फ्लॅट आहे, ज्याला सुशांतच्या मृत्यूनंतर भाडेकरू मिळत नव्हता. याचे कारण म्हणजे सुशांतची येथील कथित आत्महत्या. या घराचा मालक विदेशात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. या फ्लॅटसाठी तो भाडेकरू शोधत होता, पण आता त्याचा शोध संपला आहे.
इतके भाडे नवीन भाडेकरूला द्यावे लागणार आहे - मीडियावर विश्वास ठेवला तर, सुशांत गेल्यानंतर रिकामे झालेल्या फ्लॅटसाठी नवीन भाडेकरू महिन्याला 5 लाख रुपये भरणार आहे. यासोबतच या नवीन भाडेकरूला सुरक्षा म्हणून ३० लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
हा फ्लॅट कसा आहे? - हा फ्लॅट 3600 स्क्वेअर फूट एरियाचा आहे. यात चार बेडरूम आहेत. विशेष म्हणजे, सुशांत त्याच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी 2019 मध्ये येथे शिफ्ट झाला होता. या फ्लॅटमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती (मैत्रीण) आणि काही मित्र सुशांतसोबत राहत होते.
14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतने येथे गळफास लावून आत्महत्या केली होती. याचा तपास मुंबई पोलीस आणि केंद्रीय पथकाने केला होता. परंतु, अलिकडेच सुशांतचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या शवविच्छेदन कर्मचार्यांच्या एका सदस्याने सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचे म्हटले होते. या खुलाशानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी पुन्हा कारवाई करत चौकशी सुरू केली आहे.