मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचा आज वाढदिवस आहे. श्रीदेवीचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. श्रीदेवीचे पूर्ण नाव श्री अम्मा यंगर अय्यप्पन होते. श्रीदेवीने जवळपास चार दशके चित्रपटसृष्टीत काम केले, या काळात तिने ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही तिची गणना चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रीमध्ये केली जाते. श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त गुगलने खास डूडल शेअर केले आहे. गुगलने या खास डूडलद्वारे श्रीदेवीचा चित्रपटसृष्टीतील प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
गुगलने शेअर केले श्रीदेवीचे डूडल : श्रीदेवीला डूडल समर्पित करताना गुगलने लिहिले की, ती लहानपणीच चित्रपटांच्या प्रेमात पडली. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी ती 'कंधन करुणाई' नावाच्या तमिळ चित्रपटात दिसली होती. श्रीदेवी ही अनेक दाक्षिणात्य भाषा बोलायला शिकली. त्यामुळेच तिला भारतातील अनेक चित्रपटांमध्ये काम करायला मिळाले. गुगलने श्रीदेवीच्या स्मरणार्थ एक सुंदर चित्र तयार केले आहे. हे चित्र मुंबईच्या भूमिका मुखर्जीने तयार केले आहे. या चित्रणाच्या माध्यमातून श्रीदेवीच्या जीवनातील विशेष पैलू दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
श्रीदेवीची लोकप्रियता : श्रीदेवीला १९७६मध्ये के. बालचंद्र यांच्या मूंद्रू मुदिचू या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर तिने हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री घेतली. यानंतर तिने बॉलिवूड आपली खास ओळख निर्माण केली. हिम्मतवाला चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर, श्रीदेवीने राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला. दरम्यान यानंतर पुढच्या काही वर्षात श्रीदेवीची लोकप्रियता वाढतच गेली. 'सदमा', 'चालबाज' या चित्रपटाने तिला एका वेगळ्याच श्रेणीत बसवले. या चित्रपटांनंतर इंडस्ट्रीत नायक नसतानाही चित्रपट हिट होऊ शकतो हे प्रस्थापित करण्यात श्रीदेवी यशस्वी ठरली.
'पद्मश्री' पुरस्काराने झाला होता गौरव- श्रीदेवीने २००० मध्ये अभिनयातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स संघात सामील झाली. काही कालावधीनंतर, तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला. श्रीदेवी 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपटात २०१२मध्ये रूपेरी पडद्यावर दिसली. त्यानंतर तिला 'पद्मश्री' पुरस्कार भारत सरकारने दिला. २०१७मध्ये ती 'मॉम' या क्राईम थ्रिलर चित्रपटामध्ये दिसली या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' मिळाला. दरम्यान २०१८मध्ये तिने जगाचा निरोप घेतला.
हेही वाचा :