मुंबई - शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण जानेवारी 2023 मध्ये 'पठाण' चित्रपटातून पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. ही जोडी एकत्र पाहण्यासाठी तुम्ही उतावीळ झाला असाल तर मग तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे.
शाहरुख आणि दीपिकाचा 'ओम शांती ओम' या चित्रपटाने नुकतीच 15 वर्षे पूर्ण केली आहेत. हा चित्रपट दिल्ली, मुंबई, कोलकाता, पाटणा, भोपाळ आणि अहमदाबादसह देशभरातील 20 हून अधिक शहरांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहेत.
'ओम शांती ओम' या चित्रपटाचे 17 नोव्हेंबरला स्क्रिनिंग होणार आहे. 'ओम शांती ओम'च्या स्पेशल स्क्रीनिंगमागची कल्पना शाहरुखच्या सर्वात मोठ्या फॅन क्लबपैकी एक असलेल्या एसआरके युनिव्हर्सची आहे.
'ओम शांती ओम' हा चित्रपट फराह खानने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातून दीपिका पदुकोणने 15 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
ब्लॉकबस्टर ठरलेला हा चित्रपट एका संघर्षशील अभिनेत्याभोवती फिरतो, ज्याची भूमिका शाहरुखने केली होती. तो यशस्वी अभिनेत्री शांतीप्रिया (दीपिकाने साकारलेली) हिच्या प्रेमात पडतो. पण त्यांचे प्रेम आणि त्याची कारकीर्द फुलण्याआधीच त्याचा अपघाती मृत्यू होतो. तीस वर्षांनंतर, तो पुनर्जन्म घेतो आणि शांतीप्रियाच्या मृत्यूचा बदला घेतो.
'ओम शांती ओम' नंतर शाहरुख आणि दीपिका 'चेन्नई एक्सप्रेस' (2013) आणि 'हॅपी न्यू इयर' (2014) सारख्या चित्रपटांमध्ये पुन्हा एकत्र आले. आणि आता ही जोडी 'पठाण' मध्ये दिसणार आहे, जो 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
'पठाण'चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे आणि त्यात जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
हेही वाचा - शूटिंग खल्लास! रणवीर सिंगने 'सर्कस'चे शुटिंग संपल्याची केली घोषणा