मुंबई - Exclusive interview of Alizee : सलमान खानची बहीण अलवीरा आणि तिचा नवरा अतुल अग्निहोत्री यांची कन्या अलिझे `फर्रे' या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. तिच्या चित्रपटाची निर्मिती सलमान खानच्या 'एसकेएफ' निर्मितीसंस्थेमार्फत करण्यात आलीय. अलिझेचे आई-वडीलसुद्धा निर्मात्यांच्या भूमिकेत असून यात तिचा दुसरा मामा अरबाज खान पाहुणा कलाकार म्हणून दिसेल. अलिझेचा अभिनय पदर्पणीय चित्रपट, `फर्रे' मध्ये तिच्याबरोबर तरुण कलाकार साहिल मेहता, झेन शॉ आणि प्रसन्न बिस्ट यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. आमचे वार्ताहर कीर्तिकुमार कदम यांनी अलिझेची भेट घेतली आणि तिच्या पदर्पणातल्या चित्रपटाबद्दल गप्पा मारल्या.
तुझा पहिलाच चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. काय भावना आहेत?
आता प्रमोशन्स सुरु आहेत आणि मला थोडी भीती वाटू लागलीय, तसंच भावुक व्हायला होतंय. मध्येच उत्साह संचारल्यासारखंही वाटतं. खरं म्हणजे मला `फर्रे' बाबत 'अन्गझाइटमेन्ट' आहे. 'अन्गझाइटमेन्ट' म्हणजे 'अन्गझायटी' व 'एक्ससाईटमेन्ट' चे 'कॉम्बिनेशन'. मला काळजीयुक्त भीतीही वाटतेय त्याचबरोबर पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याचा आनंदी उत्साह देखील जाणवतोय. बऱ्याचदा आजूबाजूला काय घडतंय याची कल्पना येत नाही, परंतु आतून आनंदी वाटत राहतंय. थोडक्यात माझ्या आत अनेक भावनांचं मिश्रण झालंय आणि ते दिवसागणिक तीव्र होत चाललंय.
तुझ्या चित्रपटाचं नाव अगदी वेगळं आहे. 'फर्रे'चा अर्थ काय आणि त्याचा चित्रपटात कसा वापर झालाय?
'फर्रे' म्हणजे चीटिंग. हा शब्द उत्तर भारतात सर्रासपणे वापरला जातो. शाळेत किंवा कॉलेजांत कॉपी करण्याला फर्रे म्हणतात. 'फर्रे' ही आजच्या तरुणाईची कहाणी असून ती सत्य घटनांवर आधारित आहे. आपल्याकडे काय आहे आणि काय नाही, यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर याची कथा बेतली आहे. गरिबी अथवा श्रीमंती असली तरी प्रत्येकाला जे हवं ते मिळतंच असं नाही. परीक्षेतील चीटिंग केव्हाही वाईटच आणि चित्रपटातून जरी 'फर्रे' दाखवलं असलं तरी आम्ही कोणीही त्याची पाठराखण करीत नाही.
शालेय जीवनात जवळपास सर्वचजण छोट्या मोठ्या प्रमाणात कॉपी करतात. प्रत्येक पिढीबरोबर त्याची पद्धत बदलत गेलीय. मी आयुष्यात फक्त एकदा 'फर्रे' करण्याचा प्रयत्न केला होता. पण हिंमत झाली नाही, म्हणून करू शकले नाही. मी एकदा चिठ्ठीवर उत्तर लिहून घेऊन गेले होते परंतु टॉयलेट मध्ये गेल्यावर कागदाचा आवाज बाहेर ऐकू जाईल आणि आपण पकडले जाऊ, या भीतीने मी तो कागद बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला नाही. नंतर त्याच विषयात मला खूप कमी मार्क मिळाले आणि वाटून गेलं की कॉपी केली असती तर बरे मार्क्स मिळाले असते.
तू स्टार्स सुपरस्टार्सच्या गराड्यात वाढलीस. तुला अभिनयाचा शौक पहिल्यापासूनच होता?
खरं सांगायचं तर, नव्हता. परंतु क्रिएटिव्ह फिल्डमध्ये काहीतरी करण्याचा विचार नक्की होता. निर्मिती, दिग्दर्शन अथवा पडद्यामागे काहीतरी करणार होते. परंतु ऍक्टिंग करून बघूया म्हणून ऍक्टिंग वर्कशॉप्स केले आणि अभिनयातील माझा रस वाढू लागला. मी एक रील बनवलं आणि ती ऑडिशन म्हणून पाठवू लागले. त्यावेळेस आई-वडिलांना आनंद झाला आणि वाटलं की मी काहीतरी करू शकेन.
'फर्रे'साठी काय तयारी केलीस?
आमचे दिग्दर्शक सौमेंद्र पढी नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर आहेत. त्यांनी आमच्याकडून भरपूर अभिनय वर्कशॉप्स करून घेतले. मला संपूर्ण स्क्रिप्ट पाठ झालं होतं. वर्कशॉप्समध्ये आम्ही इम्प्रोव्हाईज करायचो. मला भूमिकेतील लहानमोठे कंगोरे सापडले होते. माझी व्यक्तिरेखा बोलेल कशी, खाईल कशी, लिहिल कशी अशा अनेक बारीकसारीक गोष्टींवर काम करता आले. कोणी वेगळे काही बोलले तरी मी माझ्या भूमिकेच्या अनुषंगाने व्यक्त व्हायला शिकले. इतर चित्रपटांसाठी कदाचित इतका वेळ मिळणार नाही तयारीसाठी, परंतु या चित्रपटासाठीची तयारी चोख होती. त्यामुळे प्रत्येकाच्या अभिनयात स्वाभाविकता आणि रियॅलिझम आलाय. तसेच ही तरुणाईची कहाणी आहे. बऱ्याच रिलेटेबल गोष्टी आहेत. आयुष्यात फॅमिली अथवा इतर व्हॅल्यू सारख्याच असतात, फक्त त्यात अनेक लेव्हल्स असतात आणि हेच 'फर्रे' अधोरेखित करतो.
हेही वाचा -
2. 'डंकी' चित्रपटामधील पहिलं गाणं 'लूट टूट' लवकरच होणार रिलीज
3. 'कांगुवा' तामिळ चित्रपट जगभरात 38 भाषांमध्ये होणार प्रदर्शित