मुंबई - सुप्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचे २०१२ साली डेंगू च्या आजाराने निधन झाले आणि ११ वर्षांनी त्यांची पत्नी पमेला चोप्रा यांचे आज न्यूमोनियाच्या आजाराने प्राणोत्क्रमण झाले. मृत्यूसमयी त्या ७४ वर्षांच्या होत्या आणि मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. यश आणि पमेला यांचा मोठा मुलगा यश राज फिल्म्स चालवतो आणि धाकटा मुलगा उदय चोप्रा अमेरिकेत असतो आणि त्यांची इंटरनॅशल विंग सांभाळतो. तो भारतात परतत असून तो शॉकमध्ये आहे. पमेला चोप्रा गेला पंधरवडा लीलावती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत्या. त्यांना न्यूमोनिया झाला होता आणि त्या व्हेंटिलेटर वर होत्या. वयाच्या ७४ वर्षी सुद्धा त्या ऍक्टिव्ह होत्या आणि आपल्या कंपनीच्या व्यवहारांत सक्रिय होत्या.
सृजनशील पमेला चोप्रा - यश चोप्रा यांच्याबरोबरच्या लग्नापूर्वी पमेला चोप्रा यांचे नाव होते पमेला सिंग. त्या उत्तम गायिका होत्या, तसेच त्यांना लिखाणातही गती होती. चित्रपटसृष्टीत त्या पम्मी आंटी म्हणून प्रसिद्ध होत्या आणि त्याचे प्रेमळ आदरातिथ्य संपूर्ण सिनेसृष्टीत फेमस होते आणि त्यांच्या घरच्या पार्ट्यांना अनेकजण आवर्जून हजेरी लावत त्यांच्या हातच्या निरनिराळ्या पाककृती चाखायला. त्या यश चोप्रा यांचा भक्कम आधारस्तंभ होत्या आणि जेव्हा यश चोप्रा यांनी आपले भाऊ बी आर चोप्रा यांच्या सावलीतून बाहेत पडत यश राज फिल्म्स ची स्थापना केली तेव्हा सुद्धा पमेला चोप्रा यशजींच्या बरोबर खांद्याला खांदा लावून साथ देत होत्या. पमेला चोप्रा म्हणजे एक क्रिएटिव्ह व्यक्तिमत्व. आपले पती यश चोप्रा यांच्या सर्वच चित्रपटांत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्या भरत नाट्यम विशारद होत्या हे फार कमी जणांना माहित आहे.
प्रथित यश गायिका आणि लेखिका पमेला चोप्रा - पमेला चोप्रा यांनी कभी कभी, दुसरा आदमी, त्रिशूल, नूरी, काला पत्थर, सिलसिला, चांदनी, डर, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मुझसे दोस्ती करोगे सारख्या अनेक चित्रपटांतून प्लेबॅक दिला आहे. त्यांना संगीताची उत्तम जाण होती त्यामुळे यश चोप्रा यांच्या चित्रपटांत नेहमीच सुंदर सुंदर गाणी बघायला मिळायची. १९७६ साली आलेल्या कभी कभी चे लेखन पमेला चोप्रा यांनी केले होते. यश चोप्रा हे रोमँटिक सिनेमांसाठी प्रसिद्ध होते आणि त्यांच्या चित्रपटांत नेहमीच महिलांना प्राधान्य असणारे रोल्स लिहिले गेलेत. त्यांच्या रोमँटिक स्वभावाला त्यांची पत्नी कारणीभूत होती असे जवळपास सर्वांचेच मत आहे. किंबहुना काही रोमँटिक चित्रपटांच्या कथा यशजींनी पमेला यांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिल्या असे अनेक जाणकार सांगतात.
निर्मात्या आणि ड्रेस डिझायनर पमेला - पमेला चोप्रा यांनी प्रोड्युसर म्हणूनही काम केलेले आहे. आईना चित्रपटाच्या त्या निर्मात्या होत्या तसेच सिलसिला, सवाल या चित्रपटांसाठी त्यांनी ड्रेस डिझाइनर म्हणून काम केले होते. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मुझसे दोस्ती करोगे, मोहब्बतें, मेरे यार की शादी हैं, वीर झारा सारख्या चित्रपटांसाठी त्या असोसिएट प्रोड्युसर होत्या. दिल तो पागल हैं मध्ये त्यांनी सहलेखिका आणि असोसिएट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्या चित्रपटात त्या सुरुवातीच्या एका सीन मध्ये पडद्यावरदेखील झळकल्या होत्या.
आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रासह यश राज फिल्म्स पोरके झाले - यश चोप्रा यांच्या पत्नी आणि आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांच्या मातोश्री पमेला चोप्रा यांना आज सकाळी स्वर्गवास झाला. आता ‘वायआरएफ‘ म्हणजे यश राज फिल्म्स खऱ्या अर्थाने पोरके झाले आहे.