मुंबई - ‘टाइमपास’ या चित्रपटाचा तिसरा भाग येऊ घातलाय त्यामुळे सध्या 'टाइमपास ३' चा सर्वत्र बोलबाला आहे. दगडूच्या भूमिकेतील प्रथमेश परब आणि पालवी बनलेल्या हृता दुर्गुळेसोबत माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळणार आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत तर संगीत अमितराज यांचं आहे. या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत.
‘टाइमपास ३’ च्या ‘ठेकेदार’ गाण्यांमधील एक ट्रेंडिंग गाणे म्हणजे 'वाघाची डरकाळी'. नुकताच ठाण्यातील रिक्षा स्टँडवर हृता दुर्गुळे, प्रथमेश परब, मनमीत पेम यांनी या गाण्यावर ठेका धरला. या वेळी त्यांना रिक्षाचालकांनीही साथ दिली. विशेष म्हणजे यात काही महिला रिक्षाचालकही होत्या. या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधवही उपस्थित होते. क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबध्द केलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर हे गाण्याला वैशाली सामंतचा ठसकेबाज आवाज लाभला आहे.
झी स्टुडिओज आणि अथांग कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३’ येत्या २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हेही वाचा - फ्लिपकार्टवर भडकले सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स, टी शर्टवरील फोटोमुळे इंटरनेटवर वादळ