पुणे - पुण्यात रविवारी राजा बहादूर मिल परिसरात प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांची लाईव्ह कॉन्सर्ट ला जवळपास एक लाखाच्यावर पासेस देण्यात आले होते. परंतु या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये वेळेचे बंधन न पाळल्यामुळे, ए आर रहमान यांना पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. कार्यक्रमाची वेळ ही चार ते दहा असताना ए आर रहमान यांनी संध्याकाळी उशिरा दहा नंतर कार्यक्रम सुरू ठेवला. त्यामुळे पुणे पोलिसांनी स्टेजवर येऊन त्यांचा कार्यक्रम बंद केला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संगीतकारांना पुणे पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवल्याच्या चर्चा सध्या पुण्यात होत आहेत.
वेळेचे बंधन ओलांडल्याने पोलिसांची कारवाई - याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे पोलीस यांनी ए आर रहमान यांच्या कार्यक्रमाला रात्रीच्या दहापर्यंत परवानगी दिली होती. परंतु ए आर रहमान यांच्या कॉन्सर्टला होणारी गर्दी ही लाखाच्यावर होती. त्यामुळे कार्यक्रमांमध्ये रहमान यांनी जशी जशी रंगत आणली, तसेच कार्यक्रम लांबत होता त्याचवेळी पुणे पोलीस निरीक्षक याने 10 नंतर कार्यक्रम सुरू असल्याने स्टेजवर येऊन कार्यक्रम बंद केला. त्याचबरोबर पोलिसांनी रहमान यांना खडे बोल सुनावले आहेत. 'कोर्टाच्या आदेशानुसार 10 नंतर कार्यक्रम घेता येत नाही. हे तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही असा कार्यक्रम कसा चालू ठेवता', अशी विचारणा पुणे पोलिसांनी त्यांना केली. त्यानंतर ए आर रहमान यांनी आपल्या कार्यक्रम बंद केला आणि ते गुपचूप स्टेजच्या पाठीमागून निघून गेले.
रहमान संगीत रजनीला दिग्गजांची उपस्थिती - या लाईव्ह कॉन्सर्टची चर्चा पुण्यात गेल्या एक महिन्यापासून आहे. कारण या मध्ये पुण्यातील अनेक उद्योगपती ,पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी ,दिग्गज पत्रकार, विविध सामाजिक संघटना लोक आणि ए आर रहमान यांचे चाहते यांच्यामध्ये या कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे या कार्यक्रमाला लाखाच्यावर पास सुद्धा देण्यात आले होते .कदाचित एवढा मोठा लोकांचा सहभाग, त्यामुळे पोलीस थांबतील,थोडा वेळ होईल अशी शक्यता संयोजकांना वाटली असेल, पण पुणे पोलिसांनी आपली कर्तव्य तत्परता दाखवत ए आर रहमान यांचा कार्यक्रम रात्री दहाला बंद केला आहे याची चर्चा आता पुण्यात सध्या जोरदार होत आहे.
कॉन्सर्टला मोठी गर्दी - ऑस्कर पुरस्कार विजेते, प्रसिद्ध संगीतका,र गायक असलेले ए आर रहमान यांचा चाहता वर्ग जगभर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्या कॉन्सर्टला मोठी गर्दी होणार. चाहत्यांचा तउत्साह वाढणार हे सगळं लक्षात घेता कार्यक्रम हा वेळेवर होईल, असं कुणाला वाटलं नाही. परंतु पुणे पोलिसांनी आपली तत्परता दाखवली आहे आणि कार्यक्रम वेळेत बंद करून ए आर रहमान यांना सुद्धा सुनावलं आहे.
हेही वाचा - Alia Bhatt Photos : आलिया भट्ट करणार 'मेट गाला'मध्ये पदार्पण; पाहा, आलियाचे रेड कार्पेटवरील फोटो